You are currently viewing चारा उपलब्धतेसाठी साखर कारखान्यांनी मनुष्यबळाने ऊस तोडणी करावी : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

चारा उपलब्धतेसाठी साखर कारखान्यांनी मनुष्यबळाने ऊस तोडणी करावी : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने साखर कारखान्यांनी यंत्रांऐवजी मनुष्यबळाच्या माध्यमातून ऊसतोडणी केल्यास जनावरांसाठी वाढ्यांच्या माध्यमातून चारा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे. या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. चारा नियोजनाच्या अनुषंगाने सर्व प्रमुख साखर कारखान्यांचे अधिकारी व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ तर दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रादेशिक साखर सहसंचालक उज्ज्वला माळशिकरे, लेखा परीक्षक (साखर) शीतल चोथे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात चारा टंचाई जाहीर झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही महत्त्वाचा असल्याने संबंधित विभागांनी समन्वयाने उपाययोजना कराव्यात. साखर कारखाने आणि शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय राहिल्यास चारा उपलब्धतेच्या प्रश्नावर मात करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊसतोडणीच्या पद्धतीबाबत योग्य निर्णय घेऊन दुष्काळ निवारणाच्या कामात प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच, सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून चारा उपलब्धतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. घोष म्हणाले, चारा टंचाईच्या या कालावधीत उसाचे वाढे हा पशुधनासाठी उपयुक्त व पौष्टिक चारा स्रोत आहे. मात्र, हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोडणी केल्यास उसाचे वाढे शेतातच पडून वाया जातात. त्यामुळे चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता, जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी मशीनऐवजी शक्य तितक्या प्रमाणात मजुरांमार्फत ऊस तोडणी करण्याबाबत सर्व साखर कारखान्यांनी आवश्यक कार्यवाही करावी, यासाठी साखर आयुक्त यांनीही प्रादेशिक सहसंचालक (साखर) आणि साखर कारखान्यांना परिपत्रक निर्गमित केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा