You are currently viewing साटेली भेडशी केंद्रशाळा आता राज्यातील 300 शाळांमधील एक ‘मॉडेल स्कूल’

साटेली भेडशी केंद्रशाळा आता राज्यातील 300 शाळांमधील एक ‘मॉडेल स्कूल’

दोडामार्ग

साटेली भेडशी येथील श्री सातेरी जिल्हा परिषद केंद्र शाळेची राज्य शासनाने मॉडेल स्कूल (आदर्श शाळा) म्हणून निवड केली. राज्यातील 300 आणि जिल्ह्यातील सहा शाळांची मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली. साटेली केंद्रशाळेच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेल्याने तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.
मार्च 2020 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या द्वितीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील या 300 शाळांची यादी घोषित करण्यात आली. सिंधुदुर्ग जिह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले वगळता अन्य तालुक्यातील प्रत्येकी एका शाळेची मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली आहे.
भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय बाबींचा समावेश आदर्श शाळा निर्मितीमध्ये असेल. शिक्षणातून मुलांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास होणे हे आदर्श शाळेचे प्रमुख उद्दिष्ट असेल. विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयातील अध्ययन फलनिष्पत्तीसह त्यांना सध्याच्या स्पर्धात्मक युगात वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित करुन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी क्रीडा, भाषण, लेखन, अभिनय, गायन, नृत्य,चित्रकला व अन्य विषयांमध्ये प्राविण्य मिळवून देण्याचे व विविध कौशल्ये विकसित करण्याचे काम आदर्श शाळेच्या माध्यमातून केले जाणार आहे. तालुक्यातील आदर्श शाळा अन्य शाळांना प्रेरणा व मार्गदर्शन देण्याचे काम करेल,तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद स्कूल कॉम्प्लेक्स संकल्पनेप्रमाणे जवळच्या अन्य शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांना या शाळेतील शैक्षणिक सोयी सुविधांचा लाभ घेता येईल. या शाळांची गुणवत्ता, मुलांची शैक्षणिक प्रगती, शिकण्याची गती, त्यांचे सामाजीकरण, त्यांचा सर्वँकष व्यक्तिमत्व विकास पाहून अन्य शाळांतील पालक त्यांच्या मुलांना अशा समृद्ध शाळेत घालण्यास पुढे येतील. भविष्यात त्या मुलांसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक व्यवस्थेचे नियोजनही करण्यात येईल. प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा उपक्रम आदर्श शाळेच्या माध्यमातून राबवला जाईल. आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना दररोज शाळेत यावेसे वाटेल असे प्रसन्न वातावरण तयार करण्यावर भर असेल.
साटेली केंद्रशाळा तालुक्यातील उपक्रमशील शाळा आहे. शाळेत डिजिटल क्लासरुम आहेत. सुसज्ज ग्रंथालय आणि विज्ञान प्रयोगशाळा आहे. क्रीडांगण आणि नाविन्यपूर्ण क्रीडा साहित्य आहे.
मुख्याध्यापक पूनम पालव आणि सर्व शिक्षक शाळेत सातत्याने नवनवे उपक्रम राबवून शाळेचा नावलौकिक कायम उंचावत ठेवण्यासाठी मेहनत घेत आहेत. कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सगळ्या क्षेत्रात शाळेने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.साटेली भेडशी ग्रामस्थही शाळेच्या प्रगतीसाठी शाळेला नेहमी सहकार्य करत आहेत.शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड झाल्याबद्दल साटेली भेडशी ग्रामस्थ, पालक, शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षण विभागाने शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 18 =