कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या ‘गोंदण’ दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
चिंचवड
शब्दांचे गोंदण मनावर कोरत साहित्याची सेवा करणाऱ्या कुलस्वामिनी प्रतिष्ठान, पुणे तर्फे प्रकाशित ‘गोंदण’ दीपावली विशेषांक २०२६ (वर्ष १३ वे) चा प्रकाशन सोहळा विज्ञान केंद्र (सायन्स पार्क), इंदिरानगर, चिंचवड येथे मोठ्या उत्साहात आणि साहित्यिक वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालय संस्था, अहिल्यानगरचे विश्वस्त मा. श्री शशिकांत सातभाई हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी (से.नि.) व तिळवण तेली समाज, पुणेचे विश्वस्त मा. श्री अनिल लक्ष्मण घाटकर यांनी भूषविले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ‘गोंदण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथा, कविता व लेख स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे मा. श्री शशिकांत सातभाई यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘गोंदण’ सारखे दिवाळी अंक हे केवळ अंक नसून ते संस्कृतीचा ठेवा आहेत. वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी दिवाळी अंक विशेष हातभार लावतात. कोणतेही सामाजिक कार्य करण्यासाठी लेखक आणि वाचक दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत. अश्या प्रेरणेतूनच स्नेहालय सारख्या असंख्य संस्थेला कार्यकर्ते मिळत जातात. अध्यक्षीय भाषणात मा. श्री अनिल घाटकर यांनी कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या १३ वर्षांच्या सामाजिक आणि साहित्यिक वाटचालीचे कौतुक केले.
या वर्षीच्या अंकात
ह. भ. प. प्रशांत महाराज मोरे, डॉ श्रीपाल सबनीस
, हेमांगी बोंडे , राजेंद्र घावटे,
डॉ संजय अहिरे, दादाभाऊ गावडे, डॉ. गुंफा कोकाटे, शेवंतराव गोविंदराव गोरे, अर्चना बोरावके , सीमा दिनकर जोशी आदी नामवंत लेखांनी चतुरस्त्र लेखन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बापूसाहेब जाधव यांनी तर संपादकीय मनोगत मा. प्राचार्य पांडुरंग गाडीलकर सर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव डॉ. चांगदेव पिंगळे यांनी केले. तर आभार माजी अध्यक्ष डॉ. नंदकुमार माळशिरसकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवट कविसम्मेलनाने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष बापूसाहेब जाधव, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर खेरे, उपाध्यक्ष संभाजीराव चौधरी, सचिव डॉ. चांगदेव पिंगळे, खजिनदार विठ्ठल जाधव, सदस्य प्रदीप वाव्हळ, सुखदेव साकोरे, सौ. शांता साकोरे, लक्ष्मण नलावडे, डॉ. सुभाष पिंगळे बिभीषण चौधरी, मच्छिंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
