प्रश्नोत्तर

प्रश्नोत्तर

जीवन एक कोडे,
आयुष्यभर न सुटणारे.
कधी तुझे कधी माझेच प्रश्न,
मला घायाळ करून सोडणारे.

कधी मनात येतात,
कधी डोक्यात जाऊन बसतात.
रात्र रात्र डोळ्यांना जागवतात.
पापण्यांवरची स्वप्नेही,
पापण्यांवरूनच उडून जातात.

तुझे प्रश्न माझ्या…
हृदयावर घाव घालतात.
तुझ्यासोबत घालवलेले दिवसही,
क्षणभंगूर वाटू लागतात.

माझे प्रश्न माझाच,
कंठ दाटून आणतात,
शब्द मुके झाल्यावर ते,
माझ्या डोळ्यातून….
अश्रू होऊन बोलतात.

तुझ्या प्रश्नांनी…
मी माझ्यातला,
*मी* शोधू लागतो,
कधी मी तुझ्यात हरवलेलो…
हेच आठवू लागतो.
आठवत नाही तो दिवस ते क्षण..
पण तुझ्या श्वासात अडकलेला,
माझा प्राण कंठात येऊन थांबतो.

माझ्या प्रश्नांनी…
आता सोडून दिलंय,
तुझ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं.
जिथे प्रश्नच वाट चुकलेत…
तिथे…
उत्तरांची काय बिशाद….
प्रश्नांच्या मागे धावण्याची???

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा