वागदे प्राथमिक शाळेला बबली राणे यांच्याकडून ५ हजारांची देणगी
आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेच्या भौतिक सुविधांसाठी मदत; सरस्वती पूजनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपली
वागदे :
सरस्वती पूजनाचे औचित्य साधून वागदे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्र. १ येथे ओसरगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास ऊर्फ बबली राणे यांनी आपल्या दिवंगत वडिल कै. आत्माराम बापू राणे आणि आई कै. अलका आत्माराम राणे यांच्या स्मरणार्थ शाळेच्या भौतिक सुविधांसाठी ५ हजार रुपयांची देणगी दिली.
शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी मदतीचा हात पुढे करत बबली राणे यांनी सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैष्णवी परब, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अंजली सरंगले यांच्यासह ग्रामस्थ, महिला आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना बबली राणे म्हणाले, “वागदे गावाने मला नेहमीच भरभरून मदत केली आहे. विद्यामंदिरात शिक्षण घेत असताना क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने मी या शाळेत येत असे. वनभोजन तसेच उपसरपंच असताना क्रीडा स्पर्धांमुळे या शाळेशी माझे कायमस्वरूपी ऋणानुबंध निर्माण झाले. समाजाचे आणि शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून शाळेसाठी काहीतरी करण्याची माझी छोटीशी इच्छा होती. आज ती पूर्ण झाली, याचा मला आनंद आहे.”
या उपक्रमातून शाळेप्रती असलेली आत्मीयता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधोरेखित झाली.
यावेळी चंदना राणे, चिनार राणे, चंद्रिका राणे, रुपेश आमडोसकर, ललित घाडीगावकर, संदीप घाडीगावकर, गणेश घाडीगावकर, गणेश चव्हाण, संदीप गावडे, विजय घाडीगावकर यांच्यासह वागदेतील ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते.
