मुंबई : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथील मराठी विभागाच्या वतीने ‘वंदे मातरम् १५०’ अंतर्गत आयोजित ‘वंदे मातरम् महिला अपूर्वम्’ या उपक्रमांतर्गत ‘शारदोत्सव व्याख्यानमाला २०२६’ या सहाव्या वर्षातील ‘नवदुर्गा : नवविचार’ या व्याख्यानमालेची पाचवी माळ गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त संपन्न झाली. ‘साहित्य क्षेत्रातील महिलांचे योगदान’ हा या व्याख्यानाचा मुख्य विषय होता. कोल्हापूर येथील साहित्यिक सौ. क्षितिजा कुलकर्णी यांनी यावेळी विद्यार्थिनींना संबोधित करत आपल्या व्याख्यानातून त्यांनी साहित्य क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. महिला साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून स्त्रियांचे भावविश्व, सामाजिक वास्तव, संघर्ष, वेदना आणि स्वत्व यांना प्रभावीपणे अभिव्यक्त केले आहे. त्यांच्या साहित्यामुळे स्त्रीजीवनाचे विविध पैलू समाजासमोर आले असून मराठी साहित्य अधिक समृद्ध झाले आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून त्यांनी वाचनाचे महत्त्वही अधोरेखित केले. वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते, संवेदनशीलता विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. साहित्याचे वाचन केवळ आनंद देत नाही, तर समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टीही देते, हा विचार त्यांच्या मार्गदर्शनातून व्यक्त झाला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विश्वभान प्रतिष्ठान (नोंदणीकृत) यांचे सौजन्य लाभले.
या व्याख्यानाच्या माध्यमातून महिला साहित्यिकांच्या योगदानाचा गौरव करण्याबरोबरच विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड, साहित्याविषयीची जिज्ञासा आणि चिकित्सक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जगदीश संसारे यांनी केले. तर प्रा. नेहा भोसले यांनी महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे स्वागत केले तसेच सहाय्यक प्रा.माधवी पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
‘नवदुर्गा : नवविचार’ या व्याख्यानमालेतील हा उपक्रम साहित्य आणि वाचनसंस्कृती यांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.
