You are currently viewing महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’चा आधार घ्या – उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांचे आवाहन

महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’चा आधार घ्या – उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांचे आवाहन

सिंधुदुर्ग : संकटात सापडलेल्या महिलांना वैद्यकीय मदत, कायदेशीर मार्गदर्शन, पोलीस सहाय्य, समुपदेशन आणि तात्पुरता निवारा अशा विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’ या उपक्रमाची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीमती शारदा पोवार यांनी केले.

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना श्रीमती पोवार यांनी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ या योजनेविषयी जनजागृती केली.

समाजात आजही अनेक महिलांना कौटुंबिक हिंसाचार, शारीरिक व मानसिक छळ तसेच विविध प्रकारच्या अत्याचारांना सामोरे जावे लागते. अशा संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळावी आणि त्यांना न्याय मिळविण्याच्या प्रक्रियेत आधार मिळावा, या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत ‘वन स्टॉप सेंटर’ अर्थात ‘सखी केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.

या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे पीडित महिलेला मदतीसाठी विविध कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासू नये, यासाठी एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार, कायदेशीर सल्ला व मदत, पोलीस सहाय्य, मानसिक आधारासाठी समुपदेशन आणि तात्पुरत्या सुरक्षित निवाऱ्याची सुविधा यांचा समावेश आहे.

‘सखी वन स्टॉप सेंटर’ हे संकटात सापडलेल्या महिलांना आधार देणारे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. महिलांना संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सहाय्य करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला किंवा अत्याचाराला बळी पडल्यास गप्प न राहता उपलब्ध मदतसेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती पोवार यांनी केले.

महिला अत्याचारासंदर्भात मदतीसाठी 181 या महिला हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सखी वन स्टॉप सेंटरच्या सुविधांची माहिती आपल्या परिसरातील महिलांपर्यंत पोहोचवून महिला सुरक्षा व सक्षमीकरणाच्या कार्यात सर्वांनी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा