घे भरारी फाउंडेशनतर्फे १७ ऑक्टोबर रोजी सावंतवाडीत भव्य दांडिया रास
महिलांसाठी विविध स्पर्धा, लकी ड्रॉ आणि आकर्षक बक्षिसांची मेजवानी
सावंतवाडी
शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे अग्रेसर असलेल्या घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आर.पी.डी. हायस्कूलच्या सभागृहात महिलांसाठी भव्य ‘दांडिया रास व गरबा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील महिलांना एकत्र आणणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे या उद्देशाने घे भरारी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. संस्थापिका मोहिनी मडगावकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या या फाउंडेशनने आजवर अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. समाजासाठी सातत्याने योगदान देणारी एक सेवाभावी संस्था म्हणून संपूर्ण जिल्ह्यात घे भरारी फाउंडेशनने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
याच सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा एक भाग म्हणून नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी दांडिया रास व गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांमधून आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि एकोपा व मैत्रीचे नाते अधिक दृढ व्हावे, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमात बेस्ट डान्सर, बेस्ट हेअर स्टाईल, बेस्ट एनर्जेटिक परफॉर्मन्स, बेस्ट सीनियर सिटीझन परफॉर्मन्स अशा विविध प्रकारांमध्ये आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय सहभागी महिलांसाठी लकी ड्रॉ व अनेक आकर्षक बक्षिसांची विशेष मेजवानी असणार आहे.
संगीत, नृत्य, उत्साह आणि आनंदाने रंगणाऱ्या या सोहळ्यात सावंतवाडी शहर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन घे भरारी फाउंडेशनच्या संस्थापिका मोहिनी मडगावकर, सल्लागार शारदा गुरव कार्याध्यक्षा रिया रेडीज, उपाध्यक्षा मेघना राऊळ, सचिव मेघा डुबळे व खजिनदार मेघना साळगावकर यांनी केले आहे.
