You are currently viewing नौदल दिनाच्या निमित्ताने १ ते ४ डिसेंबर कालावधीत मालवण शहर परिसरात मालवण पोलीस प्रशासनाच्या नागरिकांना विशेष सूचना

नौदल दिनाच्या निमित्ताने १ ते ४ डिसेंबर कालावधीत मालवण शहर परिसरात मालवण पोलीस प्रशासनाच्या नागरिकांना विशेष सूचना

मालवण :

 

महनिय, अतिमहनिय व्यक्तींचा दौरा तसेच नौदल दिनाच्या निमित्ताने १ ते ४ डिसेंबर या कालावधीत मालवण शहर परिसरातील वाहन पार्किंगची व्यवस्था तसेच अन्य कोणती कार्यवाही नागरिकांनी करावी यासाठी मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहर, परिसरातील नागरिकांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.

१ ते ४ डिसेंबर या कालावधीत आपल्या दुकानांसमोर रस्त्यावर दुचाकी, सायकल यांसारखी वाहने उभी करू नयेत. आपल्या दुकानाच्या परिसरात वाहन पार्किंगची सुविधा असल्यास साठ फूट आत मध्ये आपली वाहने उभी करावीत. वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यास रॉक गार्डन, पालिकेचे पार्किंग, बाणावलीकर यांच्या बाजारपेठेतील जागेत, तारकर्ली नाका, भंडारी हायस्कूल, टोपीवाला हायस्कूल, दांडी बीच, मोरयाचा धोंडा या ठिकाणी निश्चित केलेल्या जागेमध्ये आपली वाहने उभी करावीत.

सोमवार ४ डिसेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, आस्थापना बंद ठेवण्यात याव्यात. ४ डिसेंबर रोजी अतिशय महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त आपल्या आस्थापना किंवा दुकानातून बाहेर फिरू नये. बोर्डिंग मैदान ते देऊळवाडा या रस्त्यावर दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत तर देऊळवाडा ते तारकर्ली या रस्त्यावर दुपारी ३ ते ९ या वेळेत कोणीही अति महत्वाच्या कामाशिवाय ये- जा करू नये. आपल्या दुकानांच्या परिसरात किंवा रस्त्यालगत आपल्या मालकीच्या जागेतील झाडांच्या फांद्या, झावळे, रस्त्यावर आल्या असल्यास त्या छाटण्याची कार्यवाही स्वस्तरावर करण्यात यावी. शहरातील मुख्य रस्त्यांवर बैल, म्हैस, गाय, कुत्रा, मांजरे, कोंबडी यांसारखी जनावरे येऊ नयेत याची खबरदारी संबंधित नागरिकांनी घ्यावयाची आहे. १ डिसेंबर पूर्वी आपले हॉटेल, दुकाने, आस्थापना या ठिकाणी लावलेले बॅनर्स, होर्डिंग, बोर्ड, पोस्टर्स आदी जाहिरातीसाठी लावलेले साहित्य काढून ठेवण्यात यावेत. एखाद्या हॉटेलात दुकानात, आस्थापना या ठिकाणी किंवा परिसरात एखादी अनोळखी व्यक्ती आल्यास त्याची माहिती तत्काळ पोलीस ठाण्यात द्यावी. दुकाने, आस्थापना, हॉटेल या ठिकाणी असलेले जुने फ्रिज, गॅस, रॉकेल किंवा अन्य ज्वलनशील पदार्थ सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावेत. याची सर्व नागरिकांनी कार्यवाही करावी असे आवाहन प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =