You are currently viewing आज नवरात्रीचा पाचवा दिवस…पाचवा दिवा…पाचवी माळ

आज नवरात्रीचा पाचवा दिवस…पाचवा दिवा…पाचवी माळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*आज नवरात्रीचा पाचवा दिवस…पाचवा दिवा…पाचवी माळ* 

 

*” या देवी सर्वभूतेषु शांतीरूपेण संस्थिता* ।

*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः* ॥ ”

 

आज आपण वारकरी संप्रदाय मधील अजून एक अनमोल हिऱ्याचा म्हणजेच अत्यंत महत्वपूर्ण अशा व्यक्तीचा परिचय घेणार आहोत.

 

 

*संत कान्होपात्रा…..*

 

संत कान्होपात्रा या १५ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध संत आणि कवयित्री होत्या.

यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात झाला. अतिशय सामान्य कुटुंबात पण एका शामा नावाच्या अतिशय धनवान, रूपसंपन्न गणिकेच्या घरात झाला..रूपाने अतिशय देखणी अशी मुलगी गणिकेच्या घरात जन्मली…

 

गणिका म्हणजे अर्थात वेश्या. ….त्यामुळे आजुबाजूचे वातावरण आपण समजू शकतो…पण तरी ही कान्होपात्रा लहान पणापासूनच विठ्ठलाची निस्सिम भक्त होती..ती लहान पणापासून विठ्ठल गीते लिहित होती, गात होती. अशा आजूबाजूच्या वातावरणामुळे त्यांचे अभंग फारसे प्रसिद्ध झाले नसावेत…कारण लिहून घेणारे कुणी नव्हते….विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार घडवणाऱ्या संत कान्होपात्रा यांच्या विषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांनी बरीच अभंगरचना केली असावी, लिहून घेणारे कुणी नसल्याने त्यांचं खूप थोडं काव्य उपलब्ध आहे. पण त्यांचं जे भक्तीरसपूर्ण अभंग उपलब्ध आहेत त्यातल्या विठ्ठलभक्तीच्या आविष्काराने आपण दिपून जातो.

 

 

ऐषोआरामी आणि सुखोपभोगी वातावरणात कान्होपात्रा वाढल्या. लहाणपणीच त्यांच्या पायात बांधलेले गेलेले चाळ कोडकौतुकाचे नव्हते, तर वेश्यावृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकण्यासाठी होते. रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभोवती होतं. आईचा आग्रह तसाच होता. पण भक्तीचा अंकूर कान्होपात्रांच्या हृदयात फुटला होता. त्या घरात विठ्ठलभक्तीची परंपरा असणं शक्यच नव्हतं. तरीही विठ्ठलाची आस त्यांना लागून राहिली होती. एका विठ्ठला शिवाय त्या कशातच रमत नव्हत्या. या व्यवसायात त्या अजिबात रमल्या नाहीत…त्यांना तिटकारा होता….मुखी सतत नामस्मरण …

 

वेश्याकुळातल्या स्त्रीला गुरू तरी कुठला लाभणार? पण गणिकेच्या रूढ अशा भोगविलासी मार्गाकडे न जाता त्या परमार्थ मार्गाकडे वळल्या आणि उत्कट भक्तीने परमेश्वरस्वरूप गाठलं.

 

कान्होपात्रा रूपवती होत्या. तितक्याच बुद्धीमानही होत्या. त्या मेनका-अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथांमधून मांडलं गेलंय. गायन आणि नृत्यात त्यांनी अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं. हळूहळू त्याचं कलानैपुण्य आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली. तिची आई अत्यंत धनवान गणिका असल्याने महालासारखा त्यांचा भव्य प्रासाद होता. अनेक दासी त्यांच्या सेवेला तत्पर होत्या. शामाने (त्यांची आई) कान्होपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती. कान्होपात्रेने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा. राजदरबारी रूजू व्हावं असं शामाला वाटत होतं. तर कान्होपात्रेला त्याची किळस वाटत होती. तिला हे मान्यच नव्हतं.

 

मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष यांची नजर कान्होपात्रेवर पडली. त्याने कान्होपात्रेचं नाच-गाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली. शामाने काहीतरी सांगून कान्होपात्रेला कसंबसं त्यांच्या समोर आणलं. त्याची विषारी नजर तिच्यावर पडली. याच्या सारख्या नीच माणसाच्या इच्छेखातर आपण गायन-नृत्य करणार नाही, असं तिने त्याच्या तोंडावर सांगितलं. त्यावेळी हे धाडसच होतं खरंतर. भडकलेल्या नगराध्यक्षाने सूडसत्र सुरू केलं. . शामा आणि कान्होपात्रेचा छळ सुरू झाला. वैभव ओसरलं. त्याच्याविरूद्ध न्याय कोण देणार? अखेर शामाने त्याची माफी मागितली. त्याने तीन दिवसांत कान्होपात्रेला आपल्यासमोर आणून उभं करण्याचा हुकुम दिला. या संकटाने कान्होपात्रा डगमगली नाही. ती देवासमोर हात जोडून जप करू लागली. रात्रभर ती जप करतच होती. पहाटे डोळा लागला आणि भजन-टाळांचा गजर ऐकून कान्होपात्रेला जाग आली.

 

जाग आल्यावर तिने पाहिले , की वारकऱ्यांचा एक जत्था आषाढीनिमित्त भजन गात पंढरपूरास चालला होता. त्याक्षणी मनातला अस्पष्ट विचार त्यांनी पक्का केला. तिची म्हातारी दासी हौसा ही वारकरी होती. बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवाने दिली होती. हौसाच्या संगनमताने कान्होपात्रांनी फाटके विटके कपडे घातले आणि त्या पंढरपूरला निघाल्या. मनाला विठ्ठलाची ओढ लागली होती. मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेषात मंगळवेढे सोडलं. यापुढे रूपवती तरुण कान्होपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला. पंढरपूरला आल्यावर त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्याच्या चरणाशी तन,मन एकाग्र केलं.

 

व्याकूळ भावाने विठ्ठलाची विनवणी करू लागल्या ,

 

“मज अधिकार नाही । भेटी देई विठाबाई ।।

ठाव देई चरणापाशी । तुझी कान्होपात्रा दासी ।।”

 

आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समर्पित करून त्यांनी त्याचं दास्यत्व पत्करलं. कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागल्या आणि त्यांचा स्वगीर्य आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले. तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते. त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडला. वृद्ध हौसाबाईने कान्होपात्रेसाठी आणि स्वत:साठी एक झोपडी बांधली. कान्होपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख्ख करत असे. पहाटे आणि रात्री देवासमोर नृत्य आणि भजन करीत. लोकांना वाटे ती देवाचं वेड घेतलेली, गरीब शेतकऱ्याची पोर आहे. कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठलभक्तीत खोल बुडत गेल्या. लोक त्यांचा आदर करू लागले. भोगविलासाची इच्छा तिला नव्हतीच. मुळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने त्यांच्या ध्यानी मनी विठ्ठल राहू लागला. मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले. त्याची भेट व्हावी म्हणून तळमळ होऊ लागली.त्या म्हणतात,

 

” जिवाचे जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई

सावळे डोळसे करूणा येथु देई काही !!”

 

 

आता कुठे समाधानाचा, शांतीचा भाव मनी उपजला. विठ्ठलाचे चरण हे आत्मसुखा समान असल्याने सर्व इच्छा, वासना निमाल्या. इकडे नगरप्रमुख वर बादशहाकडे गेला. नंतर त्याने कान्होपात्रेचा पत्ता मिळवला आणि तिच्या लावण्याचं वर्णन करून तिला जनानखान्यात दाखल करण्याविषयी बादशहाला उद्युक्त केलं. बादशहाने कान्होपात्राला पाहिले आणि तिच्या सौंदर्याने वेडाच झाला. बादशहाने पंढरपूरच्या पुजाऱ्यावर फर्मान बजावलं, की त्याने कान्होपात्रेला स्वाधीन करावं. नाहीतर मंदिर जमीनदोस्त करण्यात येईल. विठ्ठलमंदिराला सैनिकांचा गराडा पडला. आपल्यासाठी लाखोंचं भक्तिस्थान आणि श्रद्धास्थान असलेलं सारसर्वस्व म्हणजे अत्यंत महत्वाचा असा मुख्य सर्वोच्च गाभा म्हणजे विठ्ठलाचं राऊळ उद्ध्वस्त व्हावं, हे तिला सहन होणं शक्यच नव्हतं. कान्होपात्रा सेनाधिकाऱ्यासमोर हजर झाली. त्यांना बादशहाकडे जायचेच नव्हते…म्हणून त्यांनी एकवार विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी मागितली.

 

कान्होपात्रा तडक देवासमोर हात जोडून उभ्या राहिल्या. . देवापासून दूर जाण्याची कल्पना त्यांच्यासाठी असह्य होती. त्या देवाला उद्देशून म्हणाल्या,

 

” नको देवराया अंत आता पाहू ।

प्राण हा सर्वस्व फुटो पाहे ।।

हरिणीचे पाड व्याघ्रे धरियले।

मजलागी जाहले तैसे देवा ।।

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी।

धावे वो जननी विठाबाई ।।

मोकलूनी आस, झाले मी उदास ।

घेई कान्होपात्रेस हृदयास ।।”

 

हा अभंग पुढे खूप प्रसिद्ध झाला.

 

परमेश्वराची आर्त व्याकूळ विनवणी करत असलेला आवाज सर्वत्र भरून राहिला. आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी त्या जोडल्या गेल्या आणि अखेर त्या चैतन्याशी एकरूप झाल्या. विठ्ठलाला घट्ट मिठी मारून आपल्या विठ्ठलाच्या पायाशी त्यांनी देह ठेवला. त्याजागी असलेल्या अक्षय तरटी वृक्ष आजही कान्होपात्रेच्या विठ्ठलभक्तीची ग्वाही देत तिथे उभा आहे.

 

संत कान्होपात्रा यांच्यासाठी विठ्ठल आई होता.

सखा होता. माय, बाप, बंधू, भगिनी होता.

 

कान्होपात्रेला काय हवं होतं?

 

‘देगा प्रेमकळा-नाम तुझे’

 

विठ्ठल तिच्यासाठी कनवाळू, मायमाऊली होता. दासाची कळकळ वागवणारा दीनांचा नाथ, कृपावंत मालक होता. भक्तांचा दास होता. ज्याच्या प्राप्तीसाठी चारी वेद, सहाही शस्त्रं शिणली तो केवळ भक्तीने प्राप्त होतो.

 

‘अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया’

अशी आर्त हाक त्या त्याला आपल्या संरक्षणासाठी मारत होत्या.

 

कान्होपात्रेच्या अपूर्व भक्तीने अखेर तिला सर्वातून मुक्ती मिळाली.

 

विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीच्या भक्तीखेरीज अशक्य होतं.

कुणी गुरू नाही. काही परंपरा नाही. भक्तीचं वातावरण नाही.

अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने त्यांनी ईश्वरप्राप्ती करून घेतली.

 

म्हणून संत कान्होपात्रा अद्वितीय ठरतात.

 

त्यांच्या विलक्षण भक्तीमुळे समाजही त्यांच्या पायाशी नतमस्तक झाला आणि कान्होपात्रांना संतपद मिळालं.

 

अशा थोर संत विभूती कान्होपात्रा यांना माझा प्रणाम.

…………………………………………………………….

© *पल्लवी उमेश*

(कॉपी राईट आहे)

“चिन्मय”,शाहूनगर,

जयसिंगपूर

मोबा.9823735570

प्रतिक्रिया व्यक्त करा