*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा सत्यवान शांताराम घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नवदुर्गा माता अष्टक*
*******************
त्रिशूळ, कमळ धरीले हातात
माथी चंद्रकोर दिसे दिमाखात
सदा सेवेसाठी वृषभ वाहन
शैलपुत्री माते करितो नमन।।१।।
घेई जपमाळ, कमंडलू हाती
शिकवी जगास सदा मनशांती
दुसरे दिवशी करिती पूजन
ब्रह्मचारिणीस करितो नमन।।२।।
देवी तुझे रूप दशभुजाकृती
नानाविध अस्त्रे धारण करती
शोभून दिसतो सिंह तो वाहन
चंद्रघंटा देवी करितो नमन।।३।।
अष्टभुजा देवी कुष्मांडा हे नाव
सूर्य मध्यभाग तुझेच ते गाव
चौथ्या दिवशीच तुझेच पूजन
कुष्मांडा माऊली करितो नमन।।४।।
चतुर्भुजाधारी तु कमळासन
पाचवे दिवशी तुझेच पूजन
रूप अलौकिक वेधी माझे मन
स्कंदमाता देवी करितो नमन।।५।।
तपश्चर्या दृढ केली कात्यायन
यास्तव तयाची झाली पुत्री धन
महिषासुराचे केलेस हनन
कात्यायनी माते करितो नमन।।६।।
रूप भयंकर परी शुभंकारी
चतुर्भुजधारी दृष्टांची संहारी
त्रीनेत्रधारीणी गाढव वाहन
कालरात्री माये करितो नमन।।७।।
महागौरी देवी ऋषभ वाहन
सिद्धीदात्री माते कमळ आसन
नवरात्रीमध्ये तुमचे पूजन
नवदुर्गा मातां करितो नमन।।८।।
***********************************
*रचनाकार:-* प्रा. सत्यवान शांताराम घाडी.
*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा
🌸🌼🏵️🌼🌸🌼🌺🌼🏵️🌼🌸
