पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले जिल्हावासीयांचे आभार
१० हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ; लोकसहभागातून निम्मे लक्ष्य साध्य; पाणीटंचाई टाळण्यासाठी मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भविष्यात पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यातील गावागावांत वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला जिल्हावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत जिल्ह्यात ५ हजार वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या १० हजार वनराई बंधाऱ्यांच्या उद्दिष्टापैकी ५० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासीयांचे मनापासून आभार मानले. भविष्यात पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा बसू नयेत, यासाठी ही मोहीम यापुढेही अशीच सुरू ठेवण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर वनमध्ये समाविष्ट झाला होता. तसेच जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी केली होती. या पाहणी दौऱ्यात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती समोर आल्यानंतर भविष्यात अशा संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रत्येक गावाने एकत्र येऊन वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील नागरिकांनी गावपातळीवर एकत्र येऊन ग्रामपंचायतींना विश्वासात घेत वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात केली. या मोहिमेत शैक्षणिक संस्था, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेतला. सर्वांनी राजकारण आणि आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा एक कुटुंब म्हणून या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्धार केला. त्यातूनच जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार वनराई बंधारे उभारण्यात यश आले आहे.
याबाबत बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच आज पाण्याने भरलेल्या विहिरी भविष्यात कोरड्या पडण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्वांनी आतापासूनच काळजी घेणे आवश्यक आहे. वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी अडविण्याचा आणि पाण्याची उपलब्धता वाढविण्याचा प्रयत्न प्रत्येक गावाने केला पाहिजे. यासाठी जिल्हावासीयांनी दाखविलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद आहे.
जिल्ह्यातील १० हजार वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी, शैक्षणिक संस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी ही मोहीम पुढेही सुरू ठेवावी. आज आपण घेतलेली काळजी भविष्यातील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून, पुढील पिढ्यांना दुष्काळाचा चटका सहन करावा लागू नये, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
जिल्ह्यातील नागरिकांनी एकजुटीने राबविलेल्या या मोहिमेमुळे १० हजार वनराई बंधाऱ्यांच्या उद्दिष्टाच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल झाली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीही जिल्हावासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन करत पालकमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा सर्व सिंधुदुर्गवासीयांचे मनापासून आभार मानले.
