You are currently viewing नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम

कोल्हापूर / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

करवीरनिवासिनी श्री अंबामाता मंदिराच्या नवरात्रोत्सवाचा आनंद, पावित्र्य आणि धार्मिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शहरातील प्रमुख धार्मिक स्थळे, रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक परिसराची व्यापक स्वच्छता करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड आणि गटनेते आदिल फरास यांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होत मंदिर परिसराची स्वच्छता केली.

नवरात्रोत्सवाच्या काळात महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मंदिर परिसर, लगतचे रस्ते, फुटपाथ तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा आणि कटिंगचा उठाव करण्यात आला. यासाठी तीन ट्रॉली आणि दोन टिप्परच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

 

यासोबतच टेंबलाई मंदिर परिसर, रंकाळा परिसर व डी-मार्टसमोरील रस्ता येथेही विशेष स्वच्छता करण्यात आली. प्रभाग क्रमांक ५ मधील खानविलकर पंप ते महावीर कॉलेज, सेवा रुग्णालय ते सर्किट हाऊस, पितळी गणपती ते डीएसपी चौक मेन रोड, तसेच प्रभाग क्रमांक १८ मधील सायबर चौक ते शेंडा पार्क मेन रोड या प्रमुख मार्गांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत शहर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने विशेष नियोजन केले आहे. भाविकांनी तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

सहायक आयुक्त स्वाती दुधाने, उपशहर अभियंता सुरेश पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक विनोद नाईक, मनोज लोट, अनिकेत सूर्यवंशी, सुरज घुणकीकर, आदित्य पवार, भूमी कदम यांच्यासह मुकादम व महापालिका कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली.

स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूरची परंपरा कायम ठेवण्यासाठी नवरात्रोत्सवात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा