You are currently viewing दोडामार्गातील रानटी हत्तींचा महिनाभरात बंदोबस्त करा; अन्यथा उच्च न्यायालयात जाणार

दोडामार्गातील रानटी हत्तींचा महिनाभरात बंदोबस्त करा; अन्यथा उच्च न्यायालयात जाणार

दोडामार्गातील रानटी हत्तींचा महिनाभरात बंदोबस्त करा; अन्यथा उच्च न्यायालयात जाणार

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांचा वन विभागाला इशारा; हत्तींचे शासकीय प्राणीसंग्रहालय किंवा वनतारा येथे स्थलांतर करण्याची मागणी

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून रानटी हत्तींच्या कळपांचा वावर वाढला असून, त्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींच्या कळपांचा तातडीने बंदोबस्त करून त्यांना शासकीय प्राणीसंग्रहालय किंवा जामनगर येथील वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करावे, अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी वन विभागाच्या मुख्य सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून हत्तींच्या कळपांकडून नागरी वस्त्या तसेच बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हत्तींच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याने काही कुटुंबांवर मोठे संकट ओढवले असून, सध्या देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या समस्येबाबत ग्रामस्थ, विविध राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी वन विभागाकडे अनेक वेळा निवेदने देऊन आंदोलने केली. मात्र, ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप मसुरकर यांनी केला आहे. हत्तींच्या कळपांचा एका भागातून दुसऱ्या भागात पाठलाग करण्याऐवजी त्यांच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.

एक महिन्याची मुदत

हत्तींच्या कळपांना पकडून त्यांचे शासकीय प्राणीसंग्रहालय किंवा वनतारा प्रकल्पात स्थलांतर करण्याची कार्यवाही एका महिन्याच्या आत करावी, अशी मागणी मसुरकर यांनी केली आहे. अन्यथा मुख्य सचिव, वन विभाग, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावून उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

भविष्यात हत्तींच्या हल्ल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी वन विभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा