जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे दैदिप्यमान यश
सावंतवाडी
१४, १७ आणि १९ वर्षे वयोगटात विजेतेपदाची शानदार कामगिरी
आंबोली, दि. ४ ऑक्टोबर २०२६ : क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आंबोलीच्या फुटबॉल संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. तालुकास्तरीय स्पर्धेत तिन्ही वयोगटांत विजेतेपद मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या आंबोलीच्या खेळाडूंनी जिल्हास्तरावरही आपले वर्चस्व सिद्ध केले.
१४ वर्षे वयोगटात दणदणीत ५–० विजय
१४ वर्षे शालेय मुले वयोगटातील अंतिम सामन्यात सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीने कुडाळ संघाचा ५–० असा दणदणीत पराभव करत जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले. या सामन्यात देव्यांश मुद्रासने दोन गोल, तर वर्धन मलिक, युगांक राणे आणि संजीत पास्ते यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.
आंबोलीच्या संघाने संपूर्ण सामन्यात आक्रमक, शिस्तबद्ध आणि प्रभावी खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व राखले.
१७ वर्षे वयोगटातही विजेतेपद
१७ वर्षे शालेय मुले वयोगटात सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीने उपांत्य सामन्यात दोडामार्ग संघाचा १–० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. या सामन्यात आयुष बाणे याने निर्णायक गोल नोंदविला.
अंतिम सामन्यात आंबोलीने कुडाळ संघाचा १–० असा पराभव करत विजेतेपद मिळविले. या सामन्यातील एकमेव विजयी गोल अथर्व कांबळे याने केला.
१९ वर्षे वयोगटात चुरशीच्या लढतीनंतर विजेतेपद
१९ वर्षे शालेय मुले वयोगटातही सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. उपांत्य सामन्यात सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीने वैभववाडी संघाचा ४–० असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महादेव देऊलकर ने तब्बल तीन गोल, तर जय गावडेने एक गोल करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
अंतिम सामन्यात सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली आणि कुडाळ यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करता न आल्याने सामना ०–० असा बरोबरीत राहिला. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये आंबोलीच्या खेळाडूंनी संयम आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवत सामना आपल्या बाजूने वळविला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये महादेव देऊलकर , जय गावडे, ऑस्टिन ब्रिटो आणि ओंकार गावडे यांनी प्रभावी पेनल्टी घेतल्या. पुढील निर्णायक पेनल्टीमध्ये पौरस नाटेकर आणि अथर्व देसाई यांनी गोल नोंदवत आंबोलीच्या संघाला विजय मिळवून दिला. अशा प्रकारे चुरशीच्या लढतीनंतर सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीने १९ वर्षे वयोगटाचे जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले.
तिन्ही वयोगटांत विजेतेपद
अशाप्रकारे १४, १७ आणि १९ वर्षे या तिन्ही वयोगटांत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीने जिल्हास्तरीय विजेतेपद मिळवून अभूतपूर्व कामगिरी केली. खेळाडूंची शिस्त, संघभावना, जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि उत्कृष्ट सांघिक समन्वय या यशाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली.
या शानदार यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, सचिव श्री. जॉय डांटस, प्राचार्य श्री. नितीन गावडे आणि कार्यालयीन सचिव श्री. दीपक राऊळ,समस्त पालक वर्ग यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे, क्रीडा शिक्षकांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या फुटबॉल संघांनी जिल्हास्तरावर केलेल्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
