महिलांच्या सक्षमीकरणासाठी सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे विविध प्रशिक्षण उपक्रम
कॅटरिंग, फॅशन डिझायनिंगसह संगणक, जुदो-कराटे व वाहन चालविण्याचे प्रशिक्षण; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने युवती व महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी विविध व्यावसायिक, तांत्रिक आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन काल सायंकाळी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी महिला व बालकल्याण सभापती मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, सुनीता पेडणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक तसेच नगरपालिका कर्मचारी परविन शेख उपस्थित होते.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासह त्यांच्या कौशल्याला व्यावसायिक दिशा देण्याच्या उद्देशाने अल्प दरात विविध प्रशिक्षणांची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये कॅटरिंग प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंग, जुदो-कराटे, संगणक प्रशिक्षण तसेच दुचाकी व चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण उपक्रमाला युवती व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने महिला सहभागी होत आहेत. महिलांना विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष श्रद्धा भोसले, नगरसेविका तसेच नगरपरिषद कर्मचारी यांचे उपस्थित युवती व महिलांनी मनःपूर्वक आभार मानले.
