ओरोस येथील पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालयात ‘व्यसनमुक्त भारत’ विषयावर जागरूकता व्याख्यान
विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ; आरोग्य, शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन
कुडाळ : सेवा संकल्प अभियानांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालय, ओरोस येथे ‘व्यसनमुक्त भारत’ या विषयावर जागरूकता व्याख्यान आयोजित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष भुपतसेन पुष्पसेन सावंत यांच्या उपस्थितीत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले.
अर्पिता मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, “व्यसनाधीनता ही समाजासमोरील गंभीर समस्या असून तिचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्याबरोबरच कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीवरही होतो. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्य, शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे. व्यसनमुक्त तरुणच विकसित भारताची भक्कम पायाभरणी करू शकतात,” असे सांगितले.
यावेळी विविध प्रकारची व्यसने, त्यांचे दुष्परिणाम, व्यसनाधीनतेची कारणे, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका तसेच व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शासन स्तरावर लागू असलेले संबंधित कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबतही माहिती देण्यात आली. उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी तुषार गवळी यांनी केले. अध्यक्षीय भाषणात भुपतसेन पुष्पसेन सावंत यांनी समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी शासन स्तरावर कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कर्पे यांनी केले.
यावेळी संस्थेच्या संचालिका ऋतुजा परब, प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, नर्सिंग स्कूलचे प्राचार्य ओंकार गरड, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग लंगुटे, महाविद्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
