‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’चे आयोजन; कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा जागर
वेंगुर्ला :
एखादी स्पर्धा भरवणे आणि ती दरवर्षी सातत्याने सुरू ठेवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. तुळससारख्या ग्रामीण भागात सलग दुसऱ्या वर्षी अशा भव्य स्वरूपात राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून राज्यभरातील भजनी कलाकारांची कला सर्वांना पाहायला मिळत असून, ही स्पर्धा केवळ विजेतेपदापुरती मर्यादित न राहता कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव ठरत आहे, असे प्रतिपादन भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, तुळस आणि आर. सी. ग्रुप, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ या राज्यस्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील कर्मयोगी कै. रामचंद्र य. तुळसकर सभागृह (श्री शिवाजी हायस्कूल) येथे ही दोन दिवसीय स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील निमंत्रित भजन मंडळांनी सहभाग घेतला आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना भाजप युवा नेते विशाल परब यांनी भजन ही केवळ करमणुकीची कला नसून संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेची वाहक असल्याचे सांगितले. तसेच पारंपरिक भजनी मंडळी या कलेच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवत असून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्पर्धेच्या सुरुवातीला झालेल्या विशेष संगीत जुगलबंदीने उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये पुरुषोत्तम परब, अमित तांबोळकर आणि विशाल घोगळे यांनी सुरेल सादरीकरण केले. तर पखवाज वादक भावेश राणे आणि तबला वादक ओंकार मेस्त्री यांनी त्यांना उत्तम साथ दिली. या सुरेल जुगलबंदीला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या प्रसंगी भाजप महिला जिल्हाध्यक्षा क्षेता कोरगावकर, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उद्योजक सुधीर झांट्ये, वेंगुर्ला भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, सरचिटणीस वसंत तांडेल, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, जैताराश्रित संस्था अध्यक्ष विष्णू परब, मंगेश राऊळ, देवस्थान मानकरी अनिल परब, पोलीस पाटील सागर सावंत, परीक्षक दीपेश मेस्त्री व मोहन मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर व सह-सूत्रसंचालन अजय नाईक यांनी केले. उपस्थितांचे आभार विजय रेडकर यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर. सी. ग्रुप, तुळसचे सदस्य तसेच भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
