साहित्य लीला पंढरी / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार यावर्षी आटपाडी तालुक्यात खरीप हंगाम २०२६ साठीची कळ एक लागू झाली असून, दुष्काळी परिस्थितीमध्ये शासनाच्या आदेशानुसार महसूल, कृषी व अन्य संबंधित यंत्रणा जलद गतीने कार्यवाही करत आहे. ही कार्यवाही वेळेत पूर्ण होण्यासाठी शेतकरी बांधवांनी यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज केले.
आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, धावडवाडी येथे दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जतचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार शितल बंडगर, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, बाधित खातेदार तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, शासनाच्या सूचनेप्रमाणे १० दिवसात पीक पंचनाम्याचे काम पूर्ण करायचे आहे. मात्र इथे काही स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे विविध कागदपत्रांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आणले आहे. त्यांना अशा अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन करून त्यांनी शेतकऱ्यांनी फक्त आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स आणि फार्मर आयडी एवढीच कागदपत्रे द्यायची असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्याला वैयक्तिक काहीच करायची गरज नसून, पीकपंचनाम्याची सर्व कार्यवाही शासकीय यंत्रणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, सद्यस्थितीत आटपाडी तालुक्यामध्ये पाटबंधारे विभागामार्फत पाणी सोडले गेले आहे. त्याच्यामुळे तालुक्यात फक्त 5 टँकर चालू आहेत. मागणीनुसार टँकरमंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले असून नागरिक व जनावरांना पिण्याचे पाणी तसेच जनावरांना चारा कमतरता भासू नये या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, झालेले नुकसान तसेच पिण्याचे पाणी व चाऱ्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या.
