१४ मान्यवरांचा विशेष सत्कार; सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या वर्धापन दिनानिमित्त ‘उद्योगिनी महाराष्ट्राची’ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा
संजीवन उद्योग समूहाच्या पुढाकारातून महिला उद्योजकतेला बळ; फिरत्या दवाखान्याचेही लोकार्पण; नाशिकमध्ये ८० रणरागिणींचा गौरव
नाशिक : महिला केवळ रोजगार मागणारी नसून रोजगार उपलब्ध करून देणारी उद्योजक बनावी, या संकल्पनेतून संजीवन उद्योग समूहाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात गाव तिथे रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे. याच उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेची संधी देत हजारो महिलांना उद्योजक बनविण्याचे काम करण्यात आले आहे.
सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त संजीवन उद्योग समूहाच्या वतीने आयोजित ‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती – उद्योगिनी महाराष्ट्राची’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा तसेच आरोग्य विभागांतर्गत फिरता दवाखाना लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी रेशीमगाठी लॉन्स, पपया नर्सरीसमोर, सातपूर बसस्थानकाजवळ, नाशिक येथे उत्साहात पार पडला.
या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, मुंबई, पुणे यांसह विविध जिल्ह्यांतून सेवाभावी संस्था प्रबोधन समिती, संजीवन उद्योग समूह व रणरागिणी सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि उत्सवी वातावरणात साजरा झाला.
कार्यक्रमात सुमारे ८० कर्तृत्ववान रणरागिणींचा ‘उद्योगिनी महाराष्ट्राची’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच उद्योग व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
आयोजक डॉ. सुनिताताई मोडक, राज्य अध्यक्ष, सेवाभावी संस्था प्रबोधन समिती तथा संस्थापक अध्यक्ष, कल्याणी संस्था यांच्या संकल्पनेतून महिलांनी रोजगारासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः रोजगार निर्माण करावा, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘महिला रोजगार मागणारी नसावी, तर रोजगार उपलब्ध करून देणारी असावी’, या विचारातून महाराष्ट्रातील महिलांना उद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना उद्योजक बनविण्याचा संजीवन उद्योग समूहाचा प्रयत्न असून, आतापर्यंत महाराष्ट्रातील हजारो महिलांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला स्वामी श्रीकण्ठानन्द, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक, महंत शंकरानंद सरस्वती, त्र्यंबकेश्वर, वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी, संस्थापक महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान नाशिक यांचे आशीर्वाद लाभले.
प्रमुख अतिथी म्हणून संतोष मंडलेचा, IPP महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, माधवजी गोरे, संस्थापक अध्यक्ष आश्रय प्रतिष्ठान, अॅड. भाऊसाहेब गंभीरे, धर्मादाय आयुक्तालय, अनामिका मोताळे, सहाय्यक धर्मदाय आयुक्त, डॉ. संजय धुर्जड, अस्थिरोग तज्ज्ञ, नाशिक यांच्यासह संतोष फसाटे, सूत्रसंचालक व मिमिक्री आर्टिस्ट, श्रुती भुतडा, मार्गदर्शक कल्याणी संस्था, नयना पाटील, संपर्कप्रमुख कल्याणी संस्था आणि नंदिनी रामचंदानी, प्रशिक्षक कल्याणी संस्था यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सुनिताताई मोडक व सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या उपक्रमातून महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार आणि आरोग्यसेवेचा संदेश महाराष्ट्रभर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
