You are currently viewing तळवडे श्री जनता विद्यालयात ‘मधुकरराव बुगडे स्मृती व्याख्यानमालेला उत्साहात प्रारंभ’

तळवडे श्री जनता विद्यालयात ‘मधुकरराव बुगडे स्मृती व्याख्यानमालेला उत्साहात प्रारंभ’

*तळवडे श्री जनता विद्यालयात ‘मधुकरराव बुगडे स्मृती व्याख्यानमालेला उत्साहात प्रारंभ’*

*सावंतवाडी संस्थानांचे युवराज लखम राजे यांच्या हस्ते उद्घाटन*

*विज्ञान, गणित व लेखन कौशल्यांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र व भौतिकशास्त्राच्या प्रात्यक्षिकांचेही आयोजन*

सावंतवाडी

या स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. तुम्ही कोणत्याही शाखेचा अभ्यासक्रम निवडा पण उच्चशिक्षित व्हा. आजच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांचे पराकाष्टा करावी लागेल ते तुम्ही नक्की कराल याची मला खात्री आहे असे प्रतिपादन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक एम व्ही कुलकर्णी यांनी केले. श्री कुलकर्णी हे शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मधुकरराव तथा अण्णासाहेब बुगडे स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा सावंतवाडी संस्थानांचे युवराज लखमराजे भोसले, प्रमुख अतिथी तथा अभिनव अकादमीचे संचालक विलास पोळ, शिक्षण प्रसारक मंडळ तळवडेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पेडणेकर, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र कांडरकर, सचिव दादा पेडणेकर, खजिनदार सुरेश गावडे, संचालक देवेश कावळे, शंकर साळगावकर विजय फेंद्रे, संस्था सल्लागार प्रा. दिलीप गोडकर, विठोबा पेडणेकर, संजय पेडणेकर, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते दादा परब, सुधीर सावंत, निळकंठ नागडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर कुंभार, पालक महेश परब, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर कोंडये, श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, मळेवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी साळसकर, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणेश मर्गज, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ डी. बी. शिंदे, डॉ. यु. सी. पाटील, डॉ वाय. ए. पवार, डॉ. ए. पी. निकुम, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वाय. ए. चौधरी, डॉ. एस. व्ही. पाटील, रसायनशास्त्र विभागाचे प्रा. सुमंगल काळे, प्रा. परेश धुरी, प्रा. दत्तप्रसाद मुळीक, समरजीत पाटील, प्राणीशास्त्र विभागाच्या श्वेता जाधव, कर्मचारी सोमनाथ दळवी आशिष नाईक, शिवाजी राठोड, राजू सावंत, संदीप ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

व्याख्यानमालेचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले यांच्या व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने, सरस्वती देवीच्या प्रतिमेला व मधुकर तथा अण्णासाहेब बुगडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.

यावेळी बोलताना युवराज लखमराजे भोसले म्हणाले ही व्याख्यानमाला म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळ तळवडेचा एक स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्याने चाकोरीबद्ध शिक्षणाचे मार्ग न निवडता आता शिक्षणाच्या नव्या वाटा ही चोखाळणे आवश्यक आहे. शिक्षण संस्थेने अशा प्रकारचे अनेक उपक्रम सातत्याने राबवावेत. त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे युवराज लखमराजे म्हणाले.

यावेळी सावंतवाडी संस्थानांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला‌‌. तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक एम व्ही कुलकर्णी यांचा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र कांडरकर यांच्या हस्ते तर अभिनव अकादमीचे संचालक विलास पोळ यांचा संस्थेचे सचिव दादा पेडणेकर व खजिनदार सुरेश गावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सल्लागार प्राध्यापक दिलीप गोडकर यांनी तर आभारप्रदर्शन श्री जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक प्रसाद आडेलकर यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, विषयाची सखोल समज, लेखनकौशल्य आणि प्रात्यक्षिक ज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमाचे पहिले पुष्प प्रा. डॉ. जी. एस. मर्गज यांनी ‘प्राण्यांचे वर्गीकरण’ या विषयावर तर प्रा. व्ही. पी. राठोड यांनी ‘लेखन कौशल्ये’ या विषयावर गुंफले.

या व्याख्यानमालेसोबतच विज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. रसायनशास्त्र विभागात दैनंदिन जीवनातील अन्नपदार्थांमधील भेसळ शोधणे व ओळखणे, दुधाचे विश्लेषण, माती व पाण्याचा सामू (pH) निश्चित करणे, श्यानता मोजणे, विविध उपकरणांचा वापर तसेच धातुक व मिश्रधातू यांसारख्या बाबींची प्रात्यक्षिके घेण्यात आली.

प्राणिशास्त्र विभागात सूक्ष्मदर्शकाचा वापर, सरपटणारे प्राणी, उभयचर, पक्षी व सस्तन प्राणी तसेच प्रवाळ, मृदुकाय, कंटकचर्मी आणि वलयकृमी यांसारख्या अपृष्ठवंशी प्राण्यांच्या नमुन्यांचे प्रदर्शन यावेळी दाखवण्यात आले. भौतिकशास्त्र विभागात भिंगे, व्हर्निअर कॅलिपर्स, मायक्रोमीटर स्क्रू गेज, मल्टीमीटर तसेच सौर पॅनेल यांवरील प्रात्यक्षिकांचा समावेश होता.

या या व्याख्यानमालेत सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी प्रा. डी. डी. गोडकर यांचे ‘मूलद्रव्यांचे आवर्त वर्गीकरण’, तर मंगळवार दि. ६ ऑक्टोबर रोजी श्री. बाळकृष्ण राणे यांचे ‘विद्युत प्रवाहाचे परिणाम’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार दि. ७ ऑक्टोबर रोजी प्रा. डॉ. व्ही. पी. सोनळकर हे ‘संभाव्यता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच गुरुवार दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रा. डॉ. डी. बी. शिंदे यांचे ‘कार्बन संयुगांचे रसायनशास्त्र’, शुक्रवार दि. ९ ऑक्टोबर रोजी डॉ. एस. व्ही. पाटील यांचे ‘ऊर्जास्रोत व प्रकाशशास्त्र’, तर शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी श्री. संतोष व्ही. सावंत यांचे ‘भूमितीय रचना’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सर्व व्याख्याने सकाळी ९ ते १०.४५ या वेळेत श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहेत

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून समजावून देण्याबरोबरच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विषयाविषयीची जिज्ञासा निर्माण करण्यासाठी ही व्याख्यानमाला व प्रात्यक्षिके उपयुक्त ठरणार आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे तसेच श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा