शिरोडा मिठाचा सत्याग्रहस्थळी विद्यार्थ्यांना प्रथम स्थान
महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन; सत्याग्रहींना श्रद्धांजली अर्पण
शिरोडा : प्रतिनिधी
शिरोडा येथील ऐतिहासिक मिठाचा सत्याग्रहस्थळी गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व देत मानवंदनेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिरोडा येथील गुरु. अ. वि. बावडेकर विद्यालय, सेंट्रल प्रायमरी स्कूल शिरोडा क्रमांक १, प्राथमिक शाळा क्रमांक १ गावडेवाडी आणि खर्डेवाडी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी देशासाठी आहुती देणाऱ्या सत्याग्रहींना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे सत्याग्रहाचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
दरम्यान, सायंकाळी सत्याग्रहस्थळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
