You are currently viewing बहुसांस्कृतिक सुसंवादाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

बहुसांस्कृतिक सुसंवादाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

बहुसांस्कृतिक सुसंवादाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

लोकशिक्षक बाबा भारती पुरस्कार सोहळा संपन्न

पिंपरी

‘जगात सर्वत्र सांस्कृतिक विसंवाद वाढला असून जगात, देशात अन् मनात शांतता नांदण्यासाठी बहुसांस्कृतिक सुसंवादाची नितांत गरज आहे!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरीगाव येथे बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी व्यक्त केले. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आणि महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार, लोकशिक्षक बाबा भारती पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डाॅ. अशोककुमार पगारिया, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पांडुरंग भोसले यांच्यासह रयत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (उच्चशिक्षण) प्राचार्य डाॅ. शिवलिंग मेनकुदळे (आदर्श प्राचार्य पुरस्कार), महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले (लोकशिक्षक बाबा भारती साहित्यसेवा पुरस्कार) आणि पिंपरी – चिंचवड महापालिका सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश जवळकर (लोकशिक्षक बाबा भारती स्नेहबंध पुरस्कार) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

डाॅ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘कर्मवीर भाऊराव अण्णांची कार्यसंस्कृती बहुधार्मिक होती. या पार्श्वभूमीवर बाबा भारती प्रतिष्ठान सांस्कृतिक समन्वयाचे प्रयत्न करीत आहे, ही स्तुत्य बाब आहे!’ डाॅ. अशोककुमार पगारिया यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात यावा, असे आवाहन केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर डाॅ. शिवलिंग मेनकुदळे यांनी, कोणताही पुरस्कार हा व्यक्तीचा नसून त्या व्यक्तीने केलेल्या कामाचा असतो, असे मत व्यक्त केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी, रयत शिक्षण संस्थेच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेतील मी विद्यार्थी असून सदर पुरस्कार आईला समर्पित करतो, अशी कृतज्ञता व्यक्त केली. प्रकाश जवळकर यांनी, धर्म, जात, भाषा यापासून लांब राहून केलेल्या निरपेक्ष कार्याचा हा सन्मान आहे, असे नमूद केले.

प्रतिमापूजन आणि सुभाष चव्हाण यांनी केलेल्या शंखवादनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. डाॅ. पांडुरंग भोसले यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र भारती, रमेश ढाले, विजय कांबळे, निमिष भारती, अप्पा देशमुख, शार्दूल भारती, अमोल ढाले, हंबीरराव पाटील, जय भारती, राजरत्न गाडे, सचिन कांबळे, आनंदा कांबळे, अनिकेत गाडे, अभिजित भोसले, उपप्राचार्या प्रा. डाॅ. संगीता अहिवळे, उपप्राचार्य प्रा. डाॅ. सुहास निंबाळकर यांनी संयोजनात सहकार्य केले. उपप्राचार्या प्रा. डाॅ. कामायनी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डाॅ. संग्राम गोसावी यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा