You are currently viewing वासुदेवाची स्वारी..
Oplus_16908288

वासुदेवाची स्वारी..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वासुदेवाची स्वारी..*

 

वासुदेवाची येता स्वारी भरून जात होते मन

काळाच्या या प्रवाहात हो कुठे हरवले सोनं..

 

बालपणी मम अंगणात तो येत होता वासुदेव

नाचत होता चिपळ्या वाजवत गात होता देव देव..

 

मोरपिसाची टोपी सुंदर झगा पायघोळ चुडीदार

दीडपायावर घेत तो गिरकी उभा राहतसे दारोदार..

 

सुप घेऊनी अक्का ताई हासत येत त्या ओसरीवर

“सुंदराबाईच्या नावानं होऽऽऽ” सूप फिरतसे गरगर गरगर..

 

पदरलावूनी हसती महिला प्रसन्नतेने दान पडतसे

घटकाभर ती होई करमणूक पितरांचा उद्धार होतसे..

 

विरंगुळ्याची होती साधने प्रभातसमयी नामस्मरण

ते

खेड्यामधूनी किती घटक ते परस्परांना भेटत होते..

 

जुने ते सोने खूप हरवले उरल्या फक्त खाणाखुणा त्या

आठवणींच्या आमुच्या कोषी अजूनी ताज्या नाचत होत्या..

 

विज्ञानाने सारे गिळले जवळ येऊनी जग फाकले

चित्रातच तो वासुदेव राहिला नवीन पिढीला नवल

वाटले…

 

“ हू इज धिस फनी गाय” विस्मयात ते पडत म्हणतील

आमुच्यासंगे “वासुदेवही” काळाच्या पडद्याआड

जातील..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा