पावसाचा प्रदीर्घ अभाव आणि कडक उन्हामुळे पिके करपली; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे आश्वासन
कुडाळ : पावसाचा प्रदीर्घ अभाव आणि कडक उन्हामुळे कुडाळ तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक भागांत पिके करपून गेली आहेत. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी रानबांबुळी, कसाल, अणाव आणि पावशी येथील बाधित शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पाहणीनंतर बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. कोकणातील बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणींशिवाय सरसकट मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात राज्य शासनाकडून तातडीने मदत दिली जाईल, तर त्यानंतर निकषानुसार एनडीआरएफ आणि केंद्र सरकारकडून मिळणारी मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. पाणीटंचाईच्या काळात गरज भासल्यास टँकरची सोय केली जाईल. तसेच तळी, बंधारे व नैसर्गिक जलस्रोतांच्या संवर्धनासाठी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, संजय पडते, जि. प. सदस्य दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, रुपेश कानडे, सुप्रिया वालावलकर, राजन परब, काका कुडाळकर, पं. स. सभापती मिलिंद नाईक, प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार सचिन पाटील आणि तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
