गावातील सर्व बंधाऱ्यांना गेट्स, फळ्या बसवण्याचे सक्त निर्देश
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; आवश्यक दुरुस्तीची माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन
सावंतवाडी | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दि. २७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेताना गावागावांत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पावसाचे पाणी अडविण्यासाठी गेट्स अथवा फळ्या तातडीने बसविण्याचे सक्त निर्देश देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक अधिकाऱ्यांना आपल्या गावातील सर्व बंधाऱ्यांची पाहणी करून पाणी अडविण्यासाठी आवश्यक गेट्स अथवा फळ्या तात्काळ बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ज्या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासाठी दुरुस्तीची आवश्यकता आहे, अशा बंधाऱ्यांची नावे तातडीने लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद उपविभाग, सावंतवाडी या कार्यालयास तसेच संबंधित ग्रुपवर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या माहितीच्या आधारे आवश्यक दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून पाणी अडविण्याच्या दृष्टीने कामे हाती घेण्यात येणार आहेत.
