You are currently viewing माझी खाद्य संस्कृती

माझी खाद्य संस्कृती

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी खाद्य संस्कृती*

(भाग ०२)

 

हॉटेलिंग आणि बिल पे करणे यांचा अनोन्य संबंध आहे, पण हॉटेलिंग करुन बिल पे करणे याचा सुतरामही संबंध नाही.

थोडं धाडसी विधान आहे पण आहे ते आहे.

 

रविवार पेठेत त्यावेळी दोनच हलवाई होते, *अग्रवाल आणि सानप*.

अग्रवालचा व्याप जरा मोठा होता, सानप चं तसं काही नव्हतं.

तो एकटाच सकाळ ते संध्याकाळ दुकानात कामही करायचा आणि बनवलेली मिठाईही विकायचा.

दुपारच्या वेळी जरा निवांत बसलेला असायचा.

तेव्हाच आम्ही तिघे तिथे जायचो बोलण्यात चलाख हेम्या त्याला याचे त्याचे भाव विचारायचा

आणि त्याच्या शोकेसच्या पलीकडील वस्तू मागायचा.

तो ती आणायला गेला की अर्धवट खपलेल्या मलई बर्फीच्या ताटात अन्या बचक्कन हात घालून मूठभर बर्फी घ्यायचा.

त्या नंतर ठरल्याप्रमाणे मालकाने घेऊन आलेल्या वस्तूवरून हेम्याचा आणि माझा वाद व्हायचा

आणि तावातावात आम्ही दुकान सोडायचो.

शनीगल्लीच्या कोपऱ्यावरच मूठभर बर्फीचे तीन समान भाग व्हायचे.

अशा वाटमारी मुळेच ना ती बर्फी ना ते दुकान शिल्लक राहिले आहे आज.

 

अग्रवाल कडची गोष्ट वेगळी होती.

तिथे मात्र शोकेसच्या मागे बसून खाण्यासाठी जागा होती.तिथला नोकरवर्ग बहुतेक जण आमची गल्लीवाले,

सगळे *संप्याला* गुरुस्थानी मानणारे.

मग काय?

यथेच्छ खाल्ल्यावर शोकेस पलीकडे बसलेल्या मालकाला बिल सांगतांना

*दोन दूध* एवढाच आवाज.मागाहून कधी कधी मांडवली करावी लागायची, अगदीच कधी कधी.

 

ही मुशाफिरी माझ्या शाळेतल्या मित्रांसोबत केलेली.

 

मेनरोडच्या *शहानू* हॉटेलात गेलाय कधी?

आत्ता शक्य नाही, ते आजघडीला इतिहासजमा झालंय.

तिथे त्या काळी ऑटो रेकॉर्ड चेंजर होता.

चार आणे टाकले की आपल्या पसंतीची गाण्यांची रेकॉर्ड लावता यायची.

त्याचेकडे ओ.पी.नय्यर ची एक एल.पी.होती ती आम्ही वारंवार ऐकायचो.

संपली की परत संपली की परत.

काय म्हणता?ओ पी आवडत होता ?

छे छे तसं काही नाही.

ओ पी तोंडपाठ करण्याचा उम्याचा (हो तोच तो *उमेश मोकाशी*) प्रयत्न होता.

का?काय?का?

एक गुजराती मुलगी होती तिच्यासाठी.

नाही नाही तिच्या साठी नाही तिच्या वडिलांसाठी.

तिचे वडील ओ पी चे फॅन होते.त्यांना ती गाणी ऐकवली आणि हंसाबेन पटवली.

नंतरच्या आयुष्यात ती त्याची अर्धांगिनी झाली.

आज ना *हंसा बेन आहे* ना *उम्या* आहे.

 

उम्या नोकरी नंतरच्या वेळात इंग्रजी भाषा व एटिकेट चे शिक्षण द्यायचा.

 

ज्या काळात भलेभले तर्खडकरांवर अडखळायचे, त्या काळात हा पठ्ठया चक्क *रेन मार्टिन* वरून इंग्रजी शिकवायचा.

खरं सांगू आजही तो लाल कापडाच्या बाईंडिंग मधला रेन मार्टिन स्वप्नांत जरी आला ना तरी मी दचकून जागा होतो.

परवा *नागराज मंजुळे* म्हणाला,”*मराठी भाषा व्याकरणात अडकली*” म्हणून.

त्याला सांगावेसे वाटते “बाबा,तू रेन मार्टिन कधी अभ्यासला आहे का रे?”

कुणी तरी सांगा रे त्याला ,म्हणावं, बाबा रे *कुठल्याही भाषेचा व्याकरनाने विकास खुंटत नाही*

*उलटपक्षी त्या विकासाला दिशा मात्र जरूर मिळते व्याकरणाने.*

 

आमच्या सगळ्याच भाषांची वाट लावली असेल तर प्रत्येक गावातल्या कॉलेज रोडवरील मंडळींनी.

“अमुक अमुक गोष्ट येतांना घेऊन ये ” हेच वाक्य

“घेऊन येशील” असे प्रश्न चिन्ह न वापरताही आज्ञाकारी वाक्याच्या थाटात उच्चारणारी ही मंडळी.

 

असो, त्याच उम्याचा एक विद्यार्थी होता भांडी बाजारात त्याच्या वडिलांचा मोठा भांड्यांचा उद्योग होता.

हे गुजराती गृहस्थ फार वाईड व्हिजनचे,

आपल्या मुलाला उद्योजक करायचे आणि बदलत्या काळानुसार

त्याला हॉटेल एटिकेट, मॅनर्स आणि परसोनॅलिटी परफेक्शन असले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता म्हणून उम्याकडे त्याला शिकवणी.

त्याला तो रोज नवनवीन हॉटेलमध्ये घेऊन जायचा आणि इंग्लिश स्पिकिंग च्या सरावासाठी मीही बरोबर असायचो .

काटे चमचे हाताळण्यापासून ते टिप देण्यापर्यंत चे ट्रेनिंग.

बिल अर्थातच तो मुलगा द्यायचा, आज तो मोठा माणूस आहे.,

हो ! बरोबर !

आजही तोच बिल देत असतो.

गुरुदक्षिणा म्हणून.नांव मुद्दाम इथे देत नाही.

 

*महिंद्रा अँड महिंद्रा ची आण्णाची टपरी* कोण विसरेल?

कंपनी म्हणजे फक्त एक मोकळं मैदान होतं.बांधकामं चालू होती .

कंपनी च्या नावाखाली फक्त R & D चा टेस्ट ट्रॅक चालू होता.तिथेच आण्णाची छोटी टपरी होती.क्रेडीट वर चालायचा व्यवहार महिन्याला.

तिथेच ऑम्लेट नंतर दुध भात खाल्ल्याचं आठवतं, थोडं हटके आहे, पण आहे ते आहे.

खाल्लं पिल्लं की आपणच टिपून ठेवायचं वहीत.वही तिथेच पडलेली असायची.

बाळ्याचं (हो तोच तो *बाळू भागवत* माझा आय.टी.आय.मेट)नि माझं जॉइंट खातं एकाच पानावर.

 

बरेच महिने सुखेनैव चालले होते की, अचानक एका महिन्याला *मोठा आण्णा* आला,वही तपासत बसला अन झालं की राव पाठवलं त्यानं बोलावणं आम्हांला.बाळ्या जायला तयार होईना मलाच जावं लागलं.

 

ये क्या है? -त्यानं ठणकावल

कैसा हिसाब करेगा हम?

 

म्हणून त्याने आमचे खाते उघडून वही माझेकडे केली.

 

म्हणालो , “उसमे क्या है आण्णा, हम दोनो का जॉइंट पन्ना है.”

अब देखो वो आया चाय पिया उसने लिखा 0.20 बादमे मैं आया मेरा बिल हुवा 1.00 रु.,मैने उसिके आगे 1.00 लिख दिया आपको लग रहा है मैे 1 का 0 किया ऐसा नहीं है मैने 0 का 1 किया,दो दो बार एन्ट्री क्यूँ करनेका ना ?

मनातल्या मनात मी गेल्या चार महिन्यात किती?

चा हिशोब केला.

झालं एवढंच की नंतरचे महिने आमचे हिशोब वेगवेगळ्या पानावर आले,पण रक्कम काही मोठी होत नव्हती.

आम्ही खात पीत तर होतो पण आमच्या पानावर बिल लिहीत नव्हतो.

 

*राजा गोसावड्या आणि काशा* बरोबर असतांना बिल आपल्याकडे?छे छे ! काहीतरीच हं !

 

सत्त्याहत्तर साली किर्लोस्करला होतो, तेंव्हा परत येतांना शालिमारला एक छोटे हॉटेल होते.(त्याला भरपूर बाहेरच्या बाजूस बसण्यास जागा होती.) तिथे आम्ही तिघे (म्हणजे *आण्णा भालेराव ,बापू बेळे* आणि आस्मादिक) नित्यनेमाने चहा व बटाटा भजी करुनच जायचो, बिल अर्थातच जो कोणी नविन आला असेल तो भरायचा त्या बदल्यात आमच्या गप्पांचा आस्वाद त्याला घेता यायचा.

एक दिवस मात्र कहर झाला, एक *चम्या* होता आमचे बरोबर.त्याला बोलतं करायच्या नादात त्यानं बोलतीच बंद केली ना आमची.

चेष्टा म्हणून त्याला काहीतरी सूनव असा लकडा लावला आम्ही तिघांनी,

तो *डबल भिंगाचा चम्या* चालू झाला.

त्या काळी बिनाका गीत माला आणि निवेदक अमीन सयानी यांची उभेउभ नक्कल अगदी सोळाच्या सोळा गाण्यांसहित विथ म्युझिक(तोंडाने वाजवलेले).

आम्ही फक्त स्तिमित होऊन पहातच राहिलो.आण्णा तर चक्क भर रस्त्यात त्याच्या पाया पडला ना त्याच्या !

 

आजकाल बटाटा भजीला गोल भजी म्हणतात.

Y Z कुठचे! अरे गोल भजी खायची ना तर या पखाल रोडच्या टोकावरील टॅक्सी स्टँड जवळ

त्या म्हातारीच्या गाड्यावर खाऊन बघा गोलभजी.

बटाटा भजी ती बटाटा भजी आणि गोलभजी ती गोलभजी.

बटाटा भजी मिळण्याचं अजून एक ठिकाण होत, चित्रमंदिरच्या बाजूच्या गल्लीत.कोळपकर फ्रेम मेकर आणि एक सलून होतं त्याच्याबाजूला.उभ्या फडताळाच होत ते,एकच फडताळ उघडलेलं.बैठक वैठक नो नो नो.

उभ्या उभ्याच, पण चव जिभेवर रेंगळायची.

 

प्रेम करणारी माणसं ही भेटली.

*कामे*,कामेच्या डब्यात एक पोळी माझ्या नावाची असायची.

डबा उघडल्या उघडल्या “ये ले ‘तेरी चपाती” म्हणून माझ्या पानात वाढायचे.

टाऊनशीपमध्ये काही कामा निमित्ताने गेलो की कामेंच्या घरी जेवण हमखास.

सेकंड शिपला असलो की एक दिवस त्यांची फर्माईश असायची”जोशी बुवा, कल तुम्हारा वो बामणी पिठला लेके आओ”

 

कामेंच्या डब्यातल ऑम्लेट, बोले तो क्या कहेना?

त्यात काहीही मालमसाला नसायचा, असायची ती फक्त आमच्या वहिणींच्या हातची चव आणि तेलात थबथबलेलं ऑम्लेट.

ऑम्लेट शऱ्याच्याही *(शरद गायकवाड)* डब्यात असायचं त्याची रेसिपी थोडी हटके होती.

शऱ्याची आई अंड्यात बेसन पीठ घालून घावन सारखं बनवायची.त्यांच्या घरी कोंबड्या पाळलेल्या होत्या.

 

ऑम्लेट खावं तर इराण्याच्या हॉटेलीच.

जुन्या सी बी एस समोर एक *ऑल इंडिया* की कायशा नावाचं हॉटेल होतं,

रोड वायडनिंग मधे गेलं ते, खत्री म्हणून त्याचे मालक.ऑम्लेट दोन स्लाइस आणि गोल कांद्याच्या चकत्या.

तसाच सरंजाम *राजदूत* हॉटेली असायचा

आता तर ऑम्लेट हे गाड्यावर मिळतात तेही उशिराच्या संध्याकाळी,बाकी सरंजाम ज्याचा त्याचा.

 

*कोल्हटकरच्या* डब्यातील तळाची पोळी.

सगळे टपून असायचे त्या पोळीवर त्या पोळीत असायची पिठीसाखर साजूक तुपातली.

कधी कधी आम्ही त्यालाही द्यायचो ती,

पण नेहमी मात्र नाही हं!

 

*अंबु* च्या डब्यातली कांदा आणि टोमॅटोची भाजी यंव रे यंव ! अशी भाजी होणे नाही.

फक्त त्यातलं व्हिटॅमिन, प्रोटीन आणि बरेच काहीचं सुलभ ज्ञान *आबा* द्यायचे.

*आबा शहारे* आमच्या सेकंड शिपच्या जेवणाच्या टेबलावरील पार्टनर.

आबा म्हणजे अफलातून माणूस नॉलेजचा खजिना आणि तो खजिना उधळायला नेहमी तय्यार.

 

H A L मध्ये कुपन सिस्टीम होती, तुम्ही म्हणाल त्यात काय सांगण्यासारखे?

गम्मत तिथेच आहे.आठ पैशात वडा पाच पैशांत चहा आणि पंचवीस पैशात जेवण.

आमचे मित्रवर्य *एम.बी.जगताप* होते कुपन देऊन वडा घेणे त्यांना अमान्य होते,

वड्याच्या लाईनीत उभं रहायचं आणि तिथपर्यंत गेलं की फक्त हात पुढे करायचा वडा हाती अशा आविर्भावात घ्यायचा की नुकतेच कूपन दिले आहे.,लगेच चहाच्या किटलीला ग्लास,चहा ग्लासात अन चालू पडायचं वर दोन चार गप्पाही मारायच्या त्या पोऱ्याशी.

ही कला शिकण्या मी जगतापला गुरु केले होते. वेळप्रसंगी उपयोगी पडली ही कला.

 

थोडक्यात काय तर,

*Statutory warning : हॉटेलिंग करणे चांगले असते,पण आपलं बिल आपणच देणे आरोग्यास घातक असते.*

 

त्या सर्वांना ही माझी खाद्य संस्कृती समर्पित, ज्यांनी ज्यांनी मला कधी बिल देण्या खिशात हात घालू नाही दिला त्यां सर्वांना.

 

ता.क. लवकरच, “माझी खाद्य संस्कृती भाग ०३”

 

 

——राजा जोशी

9823687519

〰️〰️〰️〰️〰️

प्रतिक्रिया व्यक्त करा