युवकांनी ‘विकसित भारत क्विझ’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन सहभागाची संधी
आत्तापर्यंत जिल्ह्यात ५ हजार ४० युवकांची नोंदणी
सिंधुदुर्ग
विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून ‘विकसित भारत क्विझ’चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या ज्ञानाची चाचणी घेण्याबरोबरच विकसित भारताच्या संकल्पनेशी जोडले जावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील, शिक्षाधिकारी प्राथमिक सुबोध माने, शिक्षणाधिकारी माध्यमिक व्ही एस पाटील, जिल्हा संघटक स्काउट एंड गाइड अंजली माहूरे, जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना मिलिंद कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई उपस्थित होते.
‘विकसित भारत क्विझ’ हा ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२७’ या उपक्रमाचा प्रारंभिक टप्पा आहे. देशाच्या विकासाचा प्रवास, भारतीय संस्कृती, वारसा, संविधान, विज्ञान-तंत्रज्ञान, नवोपक्रम तसेच भारताच्या भविष्यातील विकासाच्या दिशांशी संबंधित विषयांवर युवकांना जाणून घेण्याची संधी या क्विझच्या माध्यमातून मिळणार आहे. या उपक्रमात १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांना सहभागी होता येणार आहे. क्विझमध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेता येत असून, ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदणी व सहभागाची संधी उपलब्ध आहे. युवकांनी MY Bharat पोर्टलच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी व्हावे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६ हजार ३०० उद्धिष्ठापैकी ५ हजार ४० युवकांची नोंदणी पार्टलवर झाली आहे.
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये देशातील युवा शक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण, ज्ञान, नवकल्पना आणि देशाच्या विकासाबाबतची जाणीव अधिक दृढ व्हावी, यासाठी ‘विकसित भारत क्विझ’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच विविध युवा संघटनांशी संबंधित युवकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी बैठकीतून केले.
सेवा पखवाड्यांतर्गत सहभागी होण्याचे आवाहन
देशभरात सध्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा पखवाडा’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू झालेल्या या पंधरवड्यात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीपर्यंत विविध जनकल्यणाचे कार्यक्रम राबवले जात आहेत. ‘जनभागीदारी’ हे मुख्य सूत्र असलेल्या या मोहिमेअंतर्गत देशभरातील सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमा, व्यापक वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबिरे आणि रक्तदान मोहिमांचे आयोजन करण्यात येत आहे. या सेवा पखवाड्यांतर्गत विविध नागरिक, संस्थांनी कार्यक्रमांचे आयोजन करुन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
