क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ मध्ये निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न
विटा / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : दुष्काळी परिस्थितीमुळे उध्वस्त होणारी शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवन, दिल्ली तील जंतर मंतर मैदानावर तरुणाईने केलेले आंदोलन, आंदोलनामुळे सरकाराने घेतलेली धास्ती, स्त्री पुरुष समानता, निसर्ग, पर्यावरण, पाणी , दुष्काळी यासह विविध विषयांवर कविंनी आपल्या कविता सादर केल्या. मराठा वाड्यातील कविंनी पश्चिम महाराष्ट्रातील रसिकांची मने जिंकली.
निमित्त होतं क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ मध्ये क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या निमंत्रित कवि संमेलनाचे. प्रसिद्ध कवी , विंडबनकार प्रभाकर साळेगावकर ( माजलगाव) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले.
साळेगावकर म्हणाले, ” कवितेतून जगण्याची प्रेरणा मिळते. आत्महत्येला पर्याय कविता असते. वेदनेतून कवितेची निर्मिती होते. कवी काळाच्या एक पाऊल पुढे टाकत असतो. १९६९ साली क्रांतिसिंह नाना पाटील खासदार असताना, त्यांनी मराठवाडा येथे रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती.”
साळेगावकरांनी कोकणचा राजा आंबा पिकतो. या गाण्याचे विंडबन सादर केले. त्यास रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
प्रारंभी शाहीर काकासाहेब देशमुख यांनी माय कविता सादर केली. त्याद्वारे आईंच्या स्मृती जागवल्या. समितंनी पाटील यांनी ‘ जेन झी ‘ कवितेतून तरुणाई चे प्रतिनिधीत्व करणारी कविता सादर केली.
त्या म्हणतात,
पोरांनी , आमच्या आता मनावर घेतलय शिकून शहाणं होण्याचं
स्वप्न बघितलय स्वप्नांच्या त्यांच्या कोणी येऊ नका आड
जंगलं तुम्ही विकली तरी त्यांनी लावले झाड
शिकण्यासाठी पोरं सारी आंदोलन करती
लाठीकाठी मारून तुम्ही लोकशाही संपवली.
देशद्रोही त्यांना म्हणून तुमचं सत्य लपत नाही
पुरे झालं आता तुम्ही थांबावा ही तानाशाही.
दीपक पवार यांनी ‘ कापूस ‘ व ‘ दुष्काळ’ या कवितेतून शेती व शेतकरी यांचं विदारक जगणं कवितेतून मांडले.
ते कापूस कवितेत म्हणतात,
ज्यांच्यासाठी कापूस पिकवला,
त्यांनीच आमच्या नाकात कापूस कोंबला…
दुष्काळ ..
दुष्काळ शेतकऱ्यांशी
नेहमी भस्मासुरासारखा का वागतो
अलिकडे –
त्याच्यावर चर्चा करायला सुद्धा
काजू – बदामाचा खुराक लागतो ..!
व्ही.एन.देशमुख ( घर ), अनिल पाटील ( जगण्याची धडपड) , गणेश झेंडे, प्रा. हेमांगिनी माने ( चिमणा – चिमणी ) , राम सुतार ( वाघ हसे हारणीला) विमल जाधव ( काय मागू मी ) , राम मिरेकर , दीपाली घाडगे ( जाऊ दे झालं ) , सुनिल गुरव ( एक तरी झाडं लाव ) दीपाली जाधव ( पाॅलिसी) , तुकाराम पवार ( आई ) , चंद्रकांत वेल्हाळ ( ज्ञानाचे भांडार ) , वृषाली कुलकर्णी, अशोक पवार ( हेडमास्तर) , शिराज शिकलगार, सिमांयती पाटील ( जेन – झी ) , विश्वनाथ गायकवाड ( प्रभात राणी ) रघुराज मेटकरी ( मी कविता लिहावी कुणासाठी ) , अॅड . सुभाष पाटील ( शंभू ) यांनी कविता सादर केल्या. मानवी रावताळे हिने मनोगत व्यक्त केले. विजयकुमार महिंद यांनी स्वागत केले. अॅड. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले.
क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाचे अध्यक्ष सुभाष पवार ,प्रा. विलास पाटील , संजय मोरे ( हणमंतवडिये ) , अरुण लंगोटे, देवकुमार दुपटे, इंद्रजीत पाटील, दत्तात्रय सपकाळ, सागर पाटील, पद्माकर यादव , दमयंती पाटील , गणेश झेंडे , शिराज शिकलगार यांच्यासह साहित्यिक रसिक उपस्थित होते.
राजेसाहेब कदम यांचे बहारदार सूत्रसंचालन :
क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेले कविसंमेलन तब्बल अडीच तास रंगले. मराठा वाड्यातून आलेले राजेसाहेब कदम यांनी प्रसंग अनुरुप कविसंमेलन उत्तरोत्तर अधिक रंगले. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
