*विभागस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी – चिंचवड शहराची बाजी*
*३७० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग; अहिल्यानगर द्वितीय तर सोलापूर संघ तृतीय*
पिंपरी
महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने तसेच बीना इंग्लिश मीडियम स्कूल व बीना स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिंपरी – चिंचवड थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने पुणे विभागस्तरीय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा रविवार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी बीना स्पोर्ट्स क्लब, आकुर्डी येथील सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या.
पुणे विभागातील सात जिल्ह्यांमधून तब्बल ३७० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. विविध वयोगट व वजनगटांमध्ये झालेल्या या थरारक सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त, जिद्द आणि क्रीडाभावनेचे दर्शन घडविले. स्पर्धेच्या अंतिम निकालामध्ये पिंपरी – चिंचवड शहर संघाने प्रथम क्रमांक, अहिल्यानगर जिल्ह्याने द्वितीय क्रमांक; तर सोलापूर जिल्ह्याच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. विजयी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास बीना स्कूलचे संस्थापक – अध्यक्ष अजहर खान, शहाजी आतार, पिंपरी – चिंचवड अल्पसंख्याक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष युसुफ कुरेशी, पिंपरी – चिंचवड राष्ट्रवादी अध्यक्ष आणि भारतीय थाई बॉक्सिंग महासंघाचे पी. वाय. आतार, बीना स्पोर्ट्स क्लबचे अखमल खान, पी. के. स्कूलचे स्पोर्ट्स प्रमुख राहुल कोरे यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचे तांत्रिक कामकाज पुणे विभाग थाई बॉक्सिंगच्या अध्यक्षा प्रियंका मट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. राष्ट्रीय पंच नाझीम शेख, अरबाज शेख, किरण माने, गायकवाड कारभारी, स्वप्निल वारुळे यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. स्पर्धेचे शिस्तबद्ध नियोजन व आयोजन गणेश मांढरे आणि अभिषेक शिंदे यांनी केले; तर रविराज गाढवे यांनी सूत्रसंचालन
केले.
या स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर पिंपरी – चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव करीत आगामी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी खेळाडूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या; तसेच थाई बॉक्सिंगच्या माध्यमातून युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, शिस्त, धैर्य आणि क्रीडावृत्ती निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धा निश्चितच प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास मान्यवरांनी पारितोषिक वितरण समारंभात व्यक्त केला.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
