*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सोन पावली गौरी आल्या*
————————————-
वृत्त : अनलज्वाला
आगमनाने उंबरठ्याशी प्रदीप्त झाल्या
घरात माझ्या सोन पावली गौरी आल्या
संध्याकाळी कुमारिकांनी घाई केली
कुरणावरती मिळून सारी वरात गेली
चिरडूरुपी गौर पाहुनी खुशीत न्हाल्या
घरात माझ्या सोन पावली गौरी आल्या
वाजत गाजत घरास साऱ्या सख्या निघाल्या
कवने, गाणी मिळून साऱ्या म्हणू लागल्या
नवीन वस्त्रे, आभुषणानी साऱ्या सजल्या
घरात माझ्या सोन पावली गौरी आल्या
पद प्रक्षालन उंबरठ्यावर करते आई
आगमनाचा निरोप साऱ्या घरास जाई
उदंड लक्ष्मी घरात आली चिंता गेल्या
घरात माझ्या सोन पावली गौरी आल्या
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
@ सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
मोबाईल 9130861304
16.09.2026
