You are currently viewing मे महिन्याची वाट

मे महिन्याची वाट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मे महिन्याची वाट …*

मे च्या महिन्याची वाट
आम्ही सारेच पाहतो
टाकूनच खाट दारी
राती चांदण्या पाहतो..

अंगणात खाटेवर
अबबब त्या चांदण्या
झुळूझुळू वाऱ्यात त्या
आम्ही किती दा मोजल्या..

हिशोब चुकत गेला
दर वेळीच फसलो
लोळतच खाटेवर
मनसोक्त की हासलो..

चांदोमामाशी बोललो
तो हासता हासलो
तो जाता दूर दूर
अन् गुडूप झोपलो…

किती मजा मजा होती
गाडं मामाचं छकडं
बैलं खिल्लारी धावती
जाई खड्यात वाकडं..

हसूनच पुरेवाट
जाई शेतात ती गाडी
मामाच्या त्या शेताची हो
आम्हा लई लई गोडी..

पाणी मेरेने धावता
आम्ही होत असू वेडे
किती छान होते ना हो
पू्र्वीचे सुंदर खेडे..

खाऊन तृप्तीचा ढेकर
तट्ट गरम भाकर
तिला दुधात चुरता
जणू टाकली साखरं..

हरवला माझा गांव
नाही विचारत मामा
दुष्काळ अवकाळीने
त्याला परागंदा केला..

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ३१ मे २०२३
वेळ : रात्री ११/०४

प्रतिक्रिया व्यक्त करा