*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मार्ग सत्याचा जपावा…!*
मनुष्यजन्म मिळता
देहाची करावी पणती
चेतवून वाती
आत्म्याची…!
पुण्यकर्माचा साठा
पुढील पिढीसाठी करावा
वाढवावा ठेवा
सुसंचिताचा…!
ओझे देहाचे
वाहताना काळही थिजावा
यासाठी जपावा
सत्यमार्ग…!
अंतिम मुक्तीसाठी
मार्ग सत्याचा जपावा
सफल व्हावा
मनुजन्म…!
भोगावेच लागती
सुखदु:खांचे सारे भोग,
सत्याचा मार्ग
अंगिकारावा…!
असत्याने आणि
दुष्कृत्याने होई पाप
जीवनावर आरोप
कलंकित…!
असे खडतर
अंतिम सत्याचा मार्ग
तरी अमोघ
आत्मानंद…!
आत्म्याच्या मुक्तीसाठी
मार्ग सत्याचा जपावा
विलीन व्हावा
परमात्म्याशी…!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
