कर्ली नदीत बुडालेल्या दर्शन टकारिया यांचा मृतदेह सापडला
होडी उलटून नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते; दुर्घटना स्थळापासून १०० ते १५० मीटर अंतरावर मृतदेह आढळला
मालवण :
गणेशोत्सवानिमित्त आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आलेले मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (मूळ रा. गुजरात) गुरुवारी कर्ली नदीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह दुर्घटना स्थळापासून सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर आढळून आला.
गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास टकारिया कुटुंबातील सदस्यांसह नदीपलीकडील जुवा येथे शेतीच्या कामासाठी छोट्या होडीने जात होते. यावेळी अचानक होडीचे संतुलन बिघडल्याने ती नदीपात्रात उलटली आणि होडीतील चौघेही पाण्यात पडले.
होडीचालक स्वप्नील संदीप वाक्कर यांनी तत्काळ मदतकार्य करत श्वेता टकारिया आणि प्रणल वाक्कर यांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढले. मात्र, दर्शन टकारिया नदीच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने बेपत्ता झाले होते.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस व महसूल प्रशासनाला माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत, पोलीस, महसूल यंत्रणा, पोलीस पाटील आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दर्शन टकारिया यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. अखेर दुर्घटना स्थळापासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला.
