धाकोरे गावात प्रथमच रक्तदान शिबीर संपन्न
दैवी उत्सवानिमित्त आरोग्य उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद; २८ रक्तदाते सहभागी, शंभरहून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी
सावंतवाडी, ता. १९ : धाकोरे (ता. सावंतवाडी)
येथील श्री पावणादेवी सेवा ट्रस्टच्या वतीने दैवी उत्सवाचे औचित्य साधून ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. तसेच मातोश्री सेवाधाम ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने नेत्रतपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही शिबिरांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीधन्वंतरी पूजनाने झाली. यावेळी सरपंच सौ. रोहिणी मुळीक, ट्रस्टचे अध्यक्ष सागर मुळीक, सचिव सुनील मुळीक, खजिनदार निलेश मुळीक, सदस्य दीपक मुळीक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक सर, चंद्रकांत मुळीक, संतोष मुळीक, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, मातोश्री सेवाधाम ट्रस्टचे डॉ. केतन सोनी, सोनल घाडी, एसएसपीएम रक्तपेढीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी मनिष यादव, पत्रकार मदन मूरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबली गवंडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कोणत्याही वेळी, कोणत्याही परिस्थितीत रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या रक्तदात्यांचा सन्मान करणे हे संस्थेचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावागावांत रक्तदानाची चळवळ पोहोचवण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक यांनीही आपल्या मनोगतातून संस्थांच्या कार्याचे कौतुक करत, गावाच्या वतीने सर्वांचे आभार मानले.
या शिबिरात भोईचे केरवडे येथील शशिकांत मल्हार व त्यांची कन्या कु. हर्षदा, अर्जुन मुळीक (कोंडूरे), प्रदीप पटेकर (आरोस), प्रतिक भगत (आजगाव), ज्ञानदेव जोशी (नाणोस), तसेच गोव्यातील दत्ताराम गाड व सौ. दिव्या यांच्यासह धाकोरे गावातील रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत एकूण २८ जणांनी रक्तदान केले. तर नेत्रतपासणी शिबिरात शंभरहून अधिक नागरिकांनी तपासणी करून घेतली.
यावेळी माजी सरपंच गणेश मुळीक, पोलिस पाटील श्रीराम राळकर, अशोक मुळीक, शंकर मुळीक, संकेत मुळीक, देवेश मुळीक, प्रज्वल मुळीक, योगराज मुळीक, संदेश वैज, जयवंत मुळीक, श्रीकांत नाईक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजयबुवा मुळीक यांनी केले, प्रास्ताविक सुनील मुळीक यांनी सादर केले तर आभार प्रदर्शन दीपक मुळीक यांनी केले.
