ज्येष्ठ पत्रकार के. जी. गावडे यांच्या निधनाने मठ गावचा समाजसेवक हरपला
३३ वर्षांच्या निष्कलंक पत्रकारितेसोबत गावाच्या विकासासाठी सातत्याने धडपड; मठ येथील श्रद्धांजली सभेत मान्यवरांकडून आदरांजली
वेंगुर्ले (वार्ताहर) :
वेंगुर्ले तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार के. जी. गावडे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह मठ गावाने एक निष्ठावंत समाजसेवक गमावल्याची भावना मठ येथे आयोजित श्रद्धांजली सभेत विविध मान्यवरांनी व्यक्त केली.
के. जी. गावडे यांनी तब्बल ३३ वर्षे पत्रकारिता करताना कोणालाही न दुखावता निष्कलंक पत्रकारिता केली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच कला-सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जपले. पत्रकारितेबरोबरच मठ गावाच्या विकासासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
गावातील विकासकामे केवळ स्वतःच्या वाडीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण गावातील जनतेच्या सोयी-सुविधांसाठी व्हावीत, यासाठी ते लोकप्रतिनिधी, आमदार, पालकमंत्री तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत असत. या कामामागे त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
संत लालाजी मंडळाची स्थापना करून दिवाळीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यातही त्यांचा पुढाकार होता. या कार्यक्रमांना सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ते प्रयत्नशील असत. सर्वांशी प्रेमाने वागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे सामाजिक क्षेत्रातही विशेष स्थान निर्माण झाले होते.
श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रातिक सदस्य एम. के. गावडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्लेचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, अॅड. एन. पी. मठकर, आरोलकर नर्सरीचे संचालक शिवराम आरोलकर, मठ विकास संस्थेचे चेअरमन सुभाष बोवलेकर, पत्रकार संघाचे सल्लागार प्रदीप सावंत, माजी पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज, संत लालाजी मंडळाचे सचिन आईर, सामाजिक कार्यकर्ते दादा गावडे, प्रकाश गावडे, दत्ता कोकरे, बबन परब, उमेश नाईक, सुधाकर नाईक, देऊ परब, एकनाथ भगत, रामकृष्ण गावडे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मठ येथील ग्रामस्थ तसेच के. जी. गावडे यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
