वैभववाडी तालुका शाखेच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साध्या पद्धतीने साजरा.
वैभववाडी
आज १५ मार्च जागतिक ग्राहक दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावरील हा कार्यक्रम वैभववाडीचे तहसीलदार श्री.रामदास झळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी ग्राहकांना मिळालेले मुलभूत हक्क शिवाय ग्राहकांची कर्तव्ये याबाबत माहिती दिली. व्यापारी असो वा दुकानदार तो देखील कोणाचा तरी ग्राहक आहे त्यामुळे व्यापारी व विक्रेत्यांनी ग्राहकांना कोणतीही प्रलोभने, अमिषे दाखवून न फसवता सरळ सेवा दिली पाहिजे असे मत महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.तेजस साळुंखे यांनी व्यक्त केले.
ग्राहकांचे हित जोपासणे हे आमचे कर्तव्य असून ग्राहक व व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून ग्राहक पंचायत काम करीत आहे असे मत तालुका अध्यक्ष श्री.शंकर स्वामी यांनी व्यक्त केले.
वैभववाडी शहरातील मच्छी मार्केट नियोजित जागेत स्थलांतरित करावे, रेल्वे फाटक परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी व अपघात लक्षात घेता तेथील परिसरात रस्त्याला दुभाजक बसवावे, वैभववाडी ते रत्नागिरी बस सुरु करावी, सरासरी पेक्षा जास्त बिल आलेल्या ग्राहकांना ती कशी भरावी व त्याबाबतच्या अनेक प्रश्नांबाबत महावितरण कंपनीने ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे असे प्रश्न या वेळी तालुकाध्यक्ष श्री.स्वामी यांनी उपस्थित केले. कार्यक्रमाला वैभववाडी नगरपंचायत,महावितरण व आरोग्य विभागाचे प्रतिनिधी अनुपस्थित होते त्याबद्दल तिव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांना नोटीस देण्यात यावी अशी मागणी स्वामी यांनी तहसीलदार यांच्याकडे केली.
देशाच्या प्रथम नागरिकापासून ते सर्वसामान्य व्यक्ती पर्यंत आपण सर्वजण ग्राहक आहोत असे मा.तहसीलदार यांनी आपल्या भाषणात सांगितले. तालुका स्तरावरील आपल्या दालनातील कार्यक्रमाबरोबरच जिल्ह्याच्या ऑनलाईन कार्यक्रमात देखील ते सहभागी झाले होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आपण साध्या पद्धतीने साजरा करत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार श्री.नाईक, प्रवासी महासंघ जिल्हाध्यक्ष तेजस साळुंखे, ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष शंकर स्वामी, व्यापारी मंडळाचे मनोज सावंत, वाहतूक नियंत्रक संजयकुमार भोवड, पुरवठा निरीक्षक आर. डी. दांडगे, पुरवठा विभागाचे खाडे, लिपिक के.एन.मगदुम तसेच मंदार चोरगे, इंद्रजित परबते, अंकिता गोरुले इत्यादी ग्राहक पंचायत चे सदस्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते.