You are currently viewing सांगलीत गणेशमूर्ती मिरवणुका सुरक्षित व सुरळीत पार पडण्यासाठी महापालिका प्रशासनाची पूर्वतयारी

सांगलीत गणेशमूर्ती मिरवणुका सुरक्षित व सुरळीत पार पडण्यासाठी महापालिका प्रशासनाची पूर्वतयारी

सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील गणेशमूर्ती मिरवणुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या टिळक चौक ते पटेल चौक या संपूर्ण मार्गाची आज सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने व्यापक स्वरूपात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

सांगली शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जातो. सांगली गणपती पंचायतन तसेच विविध गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या मिरवणुकीचे प्रस्थान या प्रमुख मार्गावरून होत असल्याने गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाविक, गणेशभक्त व नागरिकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर मिरवणुका सुरक्षित, सुरळीत व अडथळेमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे.

महापौर धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांनी गणेशोत्सवापूर्वी सदर प्रमुख मार्गाची संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज ही व्यापक पाहणी करण्यात आली.

या पाहणीमध्ये अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विविध विभागांचे प्रमुख, तांत्रिक अधिकारी व कर्मचारी, अभियंते तसेच MSEDCLचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

मिरवणूक मार्गावरील विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान टिळक चौक ते पटेल चौक या संपूर्ण प्रमुख मार्गावरील गणेशमूर्ती मिरवणुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यावरील खड्डे व रस्त्याची स्थिती, रस्त्यालगतची अतिक्रमणे व अडथळे, विद्युत व दूरसंचारच्या लोंबकळणाऱ्या तारा, धोकादायक स्थितीतील विद्युत पोल, स्ट्रीट लाईट व्यवस्था, मिरवणुकीस अडथळा ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या, नाले व गटारी, रस्त्यावरील अन्य अडथळे, तसेच गणेशमूर्तींच्या मिरवणुकीच्या सुरक्षित व सुरळीत वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकणाऱ्या इतर बाबी यांची पाहणी करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने महापालिकेच्या विविध विभागांसह विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवून आवश्यक बाबींची पूर्तता करण्यावर भर देण्यात येत आहे.

मिरवणूक मार्ग सुरक्षित ठेवणे, नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ न देणे आणि गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक व नागरिकांच्या हालचाली सुरळीत राहण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने पाहणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गणेशोत्सव हा सांगली शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेतील महत्त्वाचा उत्सव असून, लाखो नागरिकांच्या सहभागातून तो उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे गणेशमूर्ती मिरवणुकीचे प्रमुख मार्ग, विसर्जन व्यवस्था, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, रस्ते आणि सार्वजनिक सुरक्षितता याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.

गणेशोत्सव आनंदात, भक्तिभावात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा