You are currently viewing अभ्युदय नगरच्या राजाचा ७०वा गणेशोत्सव; भक्तीसोबत सामाजिक कार्याचा जागर

अभ्युदय नगरच्या राजाचा ७०वा गणेशोत्सव; भक्तीसोबत सामाजिक कार्याचा जागर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काळाचौकी येथील अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा ‘अभ्युदय नगरचा राजा’ या गणेशमूर्तीचा ७०वा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंडळाच्या प्रदीर्घ परंपरेला साजेशा पद्धतीने उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, आकर्षक विद्युत रोषणाई आणि सामाजिक संदेश देणारे देखावे हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले आहेत.

 

उत्सवाच्या कालावधीत रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, अन्नदान आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

 

दहा दिवसांच्या उत्सवात भजन, कीर्तन, बालकांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसह दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी मंडळाचे स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत.

 

गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही भाविकांनी गणरायाच्या चरणी हार-फुले अर्पण करण्याऐवजी वह्या, पुस्तके, पेन आणि पेन्सिली आणाव्यात, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. संकलित केलेले शैक्षणिक साहित्य गरजू तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या उपक्रमातून उत्सवातील भक्तीला समाजोपयोगी कार्याची जोड देण्यात येत आहे. गणरायाच्या आशीर्वादाने येणारा काळ सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धीचा जावो, अशी प्रार्थना मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा