*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*
*ऐकूया व्यथा प्रत्येक नदीची बदलवूया प्रथा गणेशोत्सवाची*
आज प्रत्येक जण तणावात जगताना आपण पाहतो. पण हे फक्त मानवापुरतच मर्यादित नाही असं मला वाटतं. अहो, आपण आपल्याच स्वतःमध्ये आणि आपल्या चौकटीतच इतके अडकलो आहोत की आपण ज्या समाजात, परिसरात राहतो त्या समाजाची व्यथा बघतच नाही. समाजाप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाकडे, निसर्गाकडे तर आपण पाठच फिरवली आहे किंवा त्याचा विचारही करत नाही असं मला वाटतं. तुम्ही म्हणाल हा विचार माझ्या मनात का आला? खरं सांगू, विचार नेहमीच येतो पण आज फक्त तो कागदावर उतरवायची गरज भासायला लागली.
आज निसर्ग कोपला आहे असं आपण म्हणतो. पण त्याच्या कोपाला आपणच जबाबदार नाही का? अहो निसर्गा कडे पाहिलं तर तो अक्षरशः हंबरडा फोडून आपल्याला सांगत आहे. त्याची आज आपण लक्तरं केली आहेत. डोंगर, पर्वत, टेकड्या सगळे उजाड झाले आहेत. वृक्ष, लता, झाडं झुडपी ओक्साबोक्शी रडत आहेत. आणि नद्या, नाले, ओहोळ, झरे, तलाव हे आता पाहायला मिळणे ही अवघड झाला आहे.
मुलांना आता खरे आणि प्रत्यक्ष नाले, ओहोळ, झरे, तलाव, लहान नद्या दाखवणं अवघड झालं आहे. त्यालाही आपणच जबाबदार आहोत असं मला वाटतं.अहो आपण झाड तोडली, पर्वत, डोंगर कापले; त्यांना बोडके केले. नद्यांचं तर अस्तित्वच धोक्यात आणलं. नदीला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिची आपण, आपले पूर्वज पूजा करतो ;त्याच नदीला त्या पवित्र नदीला आपण कचरा ,घाणीचे साम्राज्य केले.
गाई, म्हशी, गुरे ढोरे, धुणं, भांडी, आंघोळ, गावातला कचरा, सांडपाणी, सगळं सगळं आपण त्या नदीतच टाकतो. अगदी आताचा गणेशोत्सवाचं बघा. ज्या गणेशाची आपण मनोभावे पूजा करतो. त्याच गणेशाच्या लहान मोठ्या मुर्त्या आपण नदीत विसर्जन करतो. त्या मुर्त्यांचीही विटंबना होते आणि नदीची ही अवहेलना होते. नदीत प्लास्टर ऑफ पॅरिस मिसळते म्हणजे प्रदूषणच होते ना?
या मूर्तींबरोबरच आपण सगळं निर्माल्यही नदीतच फेकतो. नदीत आपण फक्त घाणच फेकतो. आणि नदीकडून स्वच्छ पाण्याची अपेक्षा करतो. “पेराल तेच उगवेल” यानुसार हाच नियम आपल्यालाही लागू होतो ना?
गणेशोत्सवाच्या दरम्यान नदी, समुद्राचे पाणी प्रचंड प्रमाणात दूषित होते. प्रत्येकाने जर ठरवलं तर आपण नदी प्रदूषित होऊ नये म्हणून प्रयत्न करू शकतो. कसे? अहो बाप्पा पुढचे निर्माल्य नदीत टाकू नका. त्या उलट आपल्याच घरातील एखाद्या रिकाम्या बादलीत कुंडीत ते ठेवा. त्याला वाळवून बारीक करून झाडांना खत म्हणून घाला किंवा त्याचे कंपोस्ट खत करा. म्हणजे त्या निर्माल्याने नदी अस्वच्छ होणार नाही आणि आपली झाडं ही छान वाढतील. हे निर्माल्य स्वतः किंवा अनेक घरांचे, फ्लॅट्स चे एकत्र करूनही खत करता येईल. गावात खड्डे करून कंपोस्ट खत करता येईल किंवा उन्हात वाळवता येईल. शहरातही सगळ्या बिल्डिंग मधले निर्माल्य एकत्र टेरेसवर वाळवून झाडांना खत म्हणून देता येईल.
नगरपालिका किंवा महानगरपालिकांच्या गाड्यांमधून सार्वजनिक गणेश मंडळांनी हे निर्माल्य द्यावे. सेवाभावी संस्थांनी देखील यात सहकार्य केल्यास नदी, तलाव, समुद्र खराब होणार नाही आणि या निर्माल्याचे खतही तयार होऊ शकते किंवा दहा दिवसाच्या या निर्माल्यातून घरीच आपण धूप तयार करू शकतो. खूप मोठ्या प्रमाणावर आपण धूप तयार करून तो विक्रीही करू शकतो. एखाद्या सेवाभावी संस्थेने जर हे काम केले तर त्यातून रोजगारही मिळू शकतो.
त्याचप्रमाणे ज्यांचे बाप्पा शाडू मातीचे आहेत त्यांचे घरीच विसर्जन केल्यास तीच माती आपण पुन्हा वापरू शकतो आणि पुन्हा आपला बाप्पा आपल्याकडे वर्षभर आहेच हे समाधान राहील. त्याच बाप्पाच्या मूर्तीमध्ये जर एखाद्या झाडाचे बी लावले तर नंतर छान झाडे तयार होईल पुढच्या वर्षापासून जास्तीत जास्त लोकांनी शाडू मातीचे गणपती घ्यावे आणि घरीच विसर्जन करावे अशी माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषणही कमी होईल.
शाडू मातीचे गणपती तयार करणाऱ्या सर्व मूर्तिकारांना एक नक्की सुचवावेसे वाटते. गणपतीच्या आकारानुसार त्या गणपती बाप्पाला तयार करताना त्यात एखाद्या झाडाचे बी ठेवावे जेणेकरून मूर्तीचे विसर्जन केल्यावरही बाप्पाचे अस्तित्व राहील. निसर्गही बाप्पा प्रमाणे आपल्याला आशीर्वाद देईल. नदी प्रदूषित केली नाही म्हणून आणि वृक्षारोपण केलं म्हणून निसर्गही आपल्याला आशीर्वाद देईल. बघा तर मग तुम्हाला आवडलं तर नक्कीच असं करूया आणि नदी आणि बाप्पा आणि संपूर्ण निसर्गाचा आशीर्वाद घेऊया.
बघा पटतय का तुम्हाला?
सौ.सीमा श्रीराम शास्त्री मोडक
मुख्याध्यापक
डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार
