*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकार मेघा कोल्हटकर कुलकर्णी “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*
*‘वेचावे ज्ञानकण’*
अलीकडेच दहावी – बारावीच्या [माध्यमिक आणि उच्च माध्यमिक] परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या, तशी बातमी आली आणि लगेचच हे लेखन मनांपासून करावेसे वाटले. हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा असतो विद्यार्थीजीवनांतला. अर्थात ज्याला शिक्षणाची संधी मिळते त्यालाच, असे म्हणण्याचे कारण म्हणजे काही वेळा कौटुंबिक हालाकीची परिस्थिती, तर काही वेळेला भयभीत करणारी सामाजिक परिस्थिती या सर्व अस्थिरतेमुळे काहीजण शैक्षणिक पर्वा पासून लांब फेकले जातात. खरे तर ‘ज्ञान हीच माणसाची सर्वात मोठी दृष्टी आहे’ शाळा, त्यानंतरचे क्लास यांमध्ये विद्यार्थ्याचा दिन कसा निघून जातो हे त्याला आणि पालकांना समजतच नाही. पुन्हा रात्री गृहपाठ पूर्ण करून, सकाळच्या शाळा-कॉलेज बॅग भरणे सुरू असते. दहावी असो किंवा बारावी त्यांच्या आधीची दोन वर्षे खूप महत्वाची असतात.
अभ्यास…अभ्यास… जसे वरच्या वर्गात जाऊ, तसा तो कमी होत नाही तर तो वाढतच रहातो. पण याची कल्पना यायला थोडा वेळ लागतो. सर्व ठिकाणी पारंगत असणे अशक्यप्राय गोष्ट आहे. विशेषतः इयता आठवी, नववी पासून दहावी-बारावी परीक्षांचा पाया पक्का होण्याची प्रक्रिया सुरू होते. या लेखाद्वारे विद्यार्थीवर्गास एक नक्कीच सुचवावेसे वाटते. आमच्या पिढीत पाटीपेन्सिल [Slate & white pencil] खूप महत्वाची ठरायची कारण तिच्यावर अनेकदा उत्तरे न बघता लिहिण्याची सवय व्हायची. त्यामुळे ही समस्या फारशी उद्भवत नव्हती की, उत्तर येतेय पण वेळ पुरत नाही. विषय कोणताही असू दे त्याची मुद्देसूद मांडणी गरजेची असते.
नियमीत लेखनाच्या सरावामुळे गडबड उडत नाही, खाडाखोड होत नाही. शाळा किंवा महाविद्यालयांत होणाऱ्या परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षा यांत निश्चितच फरक असतो. इयत्ता दहावीच्या दिवाळी सुट्टीपासूनच सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचा विद्यार्थ्यांनी जरूर प्रयत्न करावा. त्या त्या विषयांच्या शिक्षकांकडून तपासून घ्याव्यात, हे सर्व पूर्वपरीक्षेच्या आधी करणे गरजेचे आहे. वेळ लावून सोडवल्यामुळे आपल्याला अजून काय करावे लागेल याचा अंदाज येतो. पाठ्यपुस्तकांतील एखादा प्रश्न वेगळ्या अर्थाने विचारला असला तरी, सराव प्रश्नपत्रिकेत तो आधी कधीतरी येवून गेलेला असतो, त्यामुळे तिथेही गोंधळ उडत नाही. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न नक्कीच यशस्वी होतात.
नुसतेच वाचन करून लक्षांत रहांत नसेल तर मात्र लेखन करत करत पाठांतर करावे, मुद्देसूद उत्तरे लिहिताना सर्व मुद्दे आधी लिहून मग एक-एक मुद्याचे स्पष्टीकरण एक दोन ओळीत लिहावेत. वेळ तर वाचतोच आणि परीक्षकांना पेपर तपासणी करताना या विद्यार्थी / विद्यार्थिनीस उत्तर चांगल्या प्रकारे माहिती आहे याची खात्री पटते, गुणही उत्तम मिळण्यांस मदत होते. परीक्षेत वेळेची मर्यादा असली तरी लेखनाच्या सरावाची मदत होते. इतर वेळी सुवाच्च अक्षरांत लेखन होत असले तरी, परीक्षेत वेगाने लिहिताना फरक जाणवतो. मग ही दैनंदिन सवय कामी येते. परीक्षा म्हणजे कोणत्याही प्रकारचा बागुलबुवा नाही तर ते एक प्रतिवर्षीचे आव्हान असते. सगळी धडपड त्या उत्तम गुणांकनासाठी, कारण पाया जर चांगला झाला तर भविष्यांत अनेक संधी मिळू शकतात.
शिक्षण घेत असतानाच दहावीच्या मार्कांवर वेगवेगळ्या संधी मिळून स्वावलंबी बनण्यास मदत होते, असे आता दिसून येऊ लागले आहे. लहानपणीचे सह्वर्गी पुढे मोठे झाल्यावर, काही वर्षांनी भेटल्यावर कोण, कुठे काम करते? कितीतरी विविधता समोर येते. वर्ग एक आणि शाळाही एकच असते पण प्रत्येकजण जे घडत असते, त्यांत वेगळेपण असते. मुख्य म्हणजे जो मानसन्मान शिक्षणामुळे मिळतो त्याला तोड नसते. व्यक्तिमत्व विकासाचा तो एक शिरपेच असतो, आपल्या कार्यकर्तुत्वाने त्यांत मानाचे तुरे सजतात. ज्ञानसाधना करणेसाठी कोणत्याही वयाची अट नसते. लिखित स्वरूपांत केलेला अभ्यास पुन्हापुन्हा आठवत रहातो, उत्तराची दिशा निश्चित होते.
भाषेचा अभ्यास करताना तर विरामचिन्हे, ऱ्हस्व, दीर्घ यांचे भान ठेवावेच लागते नाहीतर महत्वाचा असणारा अर्धा गुण कुठेही काटछाट, कपात होऊ शकतो. यांसाठी एक छानसी मौलिक शब्दरूपी सदिच्छा विद्यार्थी वर्गास द्यावी वाटते. “ज्ञानकण वेचत राहून, संधीचे सोने करा. प्रयत्न सोडू नका, शिकायचे थांबू नका. Never Stop Trying, Never Stop Learning.”
© मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]
मोबाईल : ९८३४८२४०१६
शब्दसंख्या : ५२४
