सुकळवाड येथे दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात
तळगाव, गावराई व सुकळवाडमधील ४० हून अधिक दिव्यांग बांधवांचा सहभाग; योजनांची माहिती, व्हीलचेअर व अंधकाठीचे वाटप
मालवण :
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग, साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल, ब्राह्मण देव देवस्थान आणि ग्रामपंचायत सुकळवाड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सुकळवाड येथील ब्राह्मण देव मंदिरात दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा आयोजित करण्यात आला. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत झालेल्या या मेळाव्यास तळगाव, गावराई आणि सुकळवाड गावांतील ४० हून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत समारंभाने झाली. यावेळी सुकळवाडचे सरपंच युवराज गरूड, ब्राह्मण देवालय समिती सुकळवाडचे अध्यक्ष तथा तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबुराव मसुरकर, तळगावच्या सरपंच लता खोत, सुकळवाडचे पोलीस पाटील लक्ष्मण काळसेकर, ग्रामसेवक प्रदीप पाताडे, ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय पाताडे, माजी उपसरपंच सुभाष म्हसकर, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी, संस्थेच्या कर्मचारी विशाखा कासले, गीता परब, सुनील तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या कृत्रिम साहित्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून राजाराम सावंत यांना व्हीलचेअर, तर श्रीधर काळे यांना अंधकाठी प्रदान करण्यात आली.
तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबुराव मसुरकर यांनी दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन संघटितपणे विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी यांनीही दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय व निमशासकीय योजनांची माहिती देत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यानंतर साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने उपस्थित दिव्यांग बांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच गरजू दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक कृत्रिम साहित्य मिळवून देण्यासाठी नोंदणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सुनील तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले. दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच आवश्यक साधन-साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे मेळावे उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
