सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : सांगली जिल्ह्यात दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील गर्दी आणि वाहतुकीचा विचार करून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये दि. १४ सप्टेंबर २०२६ पासून दि. २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत महाराणा प्रताप चौक ते बॉम्बे बेकरी या मार्गावरील P1-P2 पार्किंगबाबतची अधिसूचना शिथिल केली आहे.
मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक ते बॉम्बे बेकरी या मार्गावर ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनांवर गणेशमूर्ती बसवून विद्युत रोषणाई करण्यात येते. या मार्गावरून गणेशोत्सवानिमित्त मिरवणुका काढण्यात येतात. तसेच, या मार्गावर शहरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने गणेशोत्सवाच्या कालावधीत मिरज शहरासह आसपासच्या गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक व भाविक खरेदी तसेच गणेश मंडळांची आरास पाहण्यासाठी येत असतात.
मिरज शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग असलेल्या महाराणा प्रताप चौक ते बॉम्बे बेकरी या मार्गावर दि. ४ जून २०१८ रोजीच्या आदेशान्वये P1-P2 पार्किंगबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती. गणेशोत्सव काळातील मिरज येथील गर्दी व बाजारपेठ याचा विचार करता P1-P2 पार्किंग बाबतची अधिसुचना 14 ते 25 सप्टेंबर 2026 कालावधीसाठी शिथिल करण्यात आली आहे.
