*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री ज्योतिषी सौ अवनी आदित्य जोशी लिखित अप्रतिम लेख*
*“मनाची साक्षरता”*
“देऊ विद्याधन सदा
आपुल्या विचारांना
जाणून ज्ञान, विज्ञान
करु साक्षर सर्वांना”
विद्या हेच धन. या धनसंपदे मध्ये आपल्याला ज्ञान देणारी अनेक माहिती, आणि अनेक शास्त्र आहेत. उदा. ज्योतिष शास्त्र, संगीत शास्त्र, हस्त शास्त्र,शकुन अपशकुन शास्त्र, मानस शास्त्र, विज्ञान इत्यादी इत्यादी..
जीवन जगत असताना निरनिराळ्या गोष्टींना प्रसंगांना आपण पाहत असतो, अनुभवत असतो, त्यातून जाणून घेऊन शिकत असतो. काही प्रसंग आपल्याला विचार करण्यास भाग पाडत असतात. उदा. घरात पाल चुकचुकणे, मांजर आडवे जाणे, अंधाऱ्या रात्री झाडावर घुबड दिसणे, मग शकुन अपशकुन मानणे, आणि तसे वागणे.
तसेच कधी कधी एखाद्या व्यक्तीचे अति चिडचिड करणे, आटोक्यात न येणारा राग राग करणे, कोणाचेही ऐकून न घेण्याची वृत्ती असणे. तसेच अति देवभोळे असणे, सतत पाप लागेल.. हे होईल, ते होईल म्हणून अति सोवळे वगैरे पाळणे. आणि मूर्तीपूजेत अडकणे.
या आणि अशा, निरनिराळ्या गोष्टी, अति टोकाला जाणाऱ्या, निरनिराळ्या लोकांच्यात, आपल्याला पहावयास रोज मिळत असतात. हे असे का घडते त्याचा विचार मात्र, तसे प्रत्यक्षात वागणारा, करणारा माणूस देखील कधी करत नसतो.
कारण काय तर मनाचा भित्रेपणा होय. आणि कधी कधी, मीच बरोबर, असा मनाचा अति आत्मविश्वास होय. पण मनाचा मनाशी संवाद मात्र कोणीही साधत नाही. कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एकांगी असला, की हे वर सांगितले तसे घडते. मग कोणी अतिविचारी होते, कोणी देवभोळे होते, तर कोणी अति हट्टी बनते.
विचार करा, आपण शाळेत जात होतो, मन तेव्हा किती निरागस, निर्मळ होते, सर्वांच्यावर प्रेम करणे आणि विद्याधन संपादन करणे, हे किती सहज आणि सोप्पे शक्य होते तेव्हा. कारण मनात आकस किंवा भीती पण नव्हती.
आपण मोठे झालो आणि बुद्धिमान केवळ, शाळेच्या प्रगती पुस्तकातच होऊन राहिलो. बाकी आता मनाशी मनाचा संवाद तर, मोठेपणी कोणाचाच घडलाच नाही. आणि म्हणून सर्व शिकून पण परत आपण असाक्षरच आहोत असे वागत आहोत.
ते तसे न होता, परत सर्वांनी दिवसांतून एकदा तरी मनाचा मनाशी संवाद साधायला हवा, तसेच ज्ञान, विज्ञान प्रसंगापरत्वे तपासून केवळ देवभोळे न होता, मनाचा भित्रेपणा दूर सारुन, श्रद्धा अंधश्रद्धा यात न अडकता विज्ञानिष्ठ दृष्टीकोन ठेवून योग्य वागणे आवश्यक आहे. निसर्गाच्या अधिक सानिध्यात जाणे, निसर्ग आपला मित्र म्हणून त्यास समजून घेणे, निसर्गाचे संवर्धन करणे, आणि आपले मतपरिवर्तन, आपणच करणे आवश्यक आहे.
रोज संगीत ऐकणे, वाचन करणे, एखादा छंद जोपासणे, चांगली मित्र संगत जोडणे, निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवणे, व्यायाम आणि योग साधना करणे आवश्यक आहे. हे सर्व करत असताना आपल्याच मनाचा आपल्याच मनाशी संवाद होणे गरजेचे आहे.
आपल्या मनाच्या साक्षरतेसाठी, सर्वांनी मनाचा मनाशी संवाद करणे आणि योग्य समजूतदारपणे वागणे म्हणजेच खरी साक्षरता आहे. चला तर मग..
“मनाचा मनाशी
संवाद साधुया
घडवून साक्षरता
सुजाण होऊया”
सौ. अवनी आदित्य जोशी.(दारशेतकर)
तळेगांव दाभाडे. जि. पुणे.
