You are currently viewing “२०४७ च्या विकसित भारतासाठी भाजप संघटना तळागाळात मजबूत करा”

“२०४७ च्या विकसित भारतासाठी भाजप संघटना तळागाळात मजबूत करा”

“२०४७ च्या विकसित भारतासाठी भाजप संघटना तळागाळात मजबूत करा”

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सावंतवाडीत आवाहन; मच्छिमारांना शेतकरी दर्जा मिळवून दिल्याबद्दल नितेश राणेंचे कौतुक

सावंतवाडी

भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्तेचे राजकारण करणारी संघटना नसून राष्ट्रहित आणि देशाच्या भवितव्याचा विचार करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०४७ पर्यंत विकसित भारत व विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.
“दिल्लीतील सत्ता पुरेशी नाही; योजनांचा लाभ गावाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे”, असे सांगत चव्हाण म्हणाले की, त्यासाठी पंचायत स्तरापासून सक्षम पक्ष संघटना आणि प्रभावी लोकप्रतिनिधी निर्माण होणे आवश्यक आहे. भाजपने ‘पार्लमेंट ते पंचायत’पर्यंत आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली असून, पक्षाची राष्ट्रनिर्माणातील भूमिका प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळाली असल्याचे सांगताना त्यांनी लोडशेडिंगमुक्ती, ‘हर घर जल’, सौर ऊर्जेचा वाढता वापर आणि ई-२० सारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. विरोधकांकडून केवळ टीआरपी आणि फेक नरेटिव्हच्या माध्यमातून राजकारण केले जात असताना भाजपची लढाई ही २०४७ च्या विकसित भारत आणि महाराष्ट्रासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किसान क्रेडिट कार्डसह केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा बँकेच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला देण्याची गरज असल्याचे सांगत “सशक्त भारतासाठी सशक्त भाजप ही काळाची गरज आहे,” असे चव्हाण म्हणाले.
नितेश राणेंच्या कार्याचे प्रदेशाध्यक्षांकडून कौतुक
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत असताना मच्छिमारांना कर्जमाफी व इतर सवलतींचा लाभ मिळवून देताना अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नितेश राणे यांनी किनारपट्टीवरील मच्छिमारांना शेतकरी म्हणून दर्जा मिळवून देण्यासाठी केलेले काम ऐतिहासिक असल्याचे गौरवोद्गार रवींद्र चव्हाण यांनी काढले.
पालकमंत्री म्हणूनही नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावीपणे काम करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपची संघटना अधिक जोमाने विस्तारत असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
बैठकीला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अतुल काळसेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा