पुणे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग येतच असतात. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगण्याची कला आत्मसात केली, तर जीवनाचा प्रवास अधिक सुखकर होतो. याच विचाराने शहरी आणि ग्रामीण जीवनातील कोणताही भेद न करता, लग्नानंतर सुमारे दहा वर्षे ग्रामीण भागाशी एकरूप होत कष्टमय परिस्थितीवर मात करणाऱ्या अपर्णा कुलकर्णी आज वयाची सत्तर वर्षे पूर्ण करून ७१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
घरकाम, स्वच्छता आणि टापटीप यांना प्राधान्य देत त्यांनी संसाराचा गाडा आजवर नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे . जुन्या गाण्यांचे श्रवण आणि चित्र रेखाटन हे छंद त्यांनी आजवर जपले. जीवनातील अनेक कठीण प्रसंगांमध्ये मैत्रिणींच्या सहवासातून दुःख विसरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कष्ट आणि अडचणींच्या काळातही जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची त्यांची वृत्ती कायम राहिली.
अपर्णा कुलकर्णी यांचे शिक्षण अकरावी पर्यंत झाले. १९७४ मध्ये अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १९७८ मध्ये त्यांचा विवाह अशोक कुलकर्णी यांच्याशी झाला. पती बँकेत नोकरीस असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत असत. त्यामुळे विवाहानंतर सुमारे दहा वर्षे अपर्णा यांना ग्रामीण भागात राहावे लागले. येलूर, दाभोळ आणि संगमेश्वर येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले.
येलूर येथे वास्तव्य करताना पाण्याचे दुर्भिक्ष्य हा रोजच्या जीवनातील मोठा प्रश्न होता. पाण्यासाठी करावी लागणारी यातायात, ग्रामीण जीवनातील कष्ट आणि मर्यादित साधनसामग्री यांचा सामना करताना त्यांना परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागले. मात्र, या अडचणींमुळे त्या कधीही नाउमेद झाल्या नाहीत.
“जीवनात आवडी-निवडीला प्राधान्य देण्याची वेळ फारशी आली नाही. त्यामुळे त्याची समस्याही निर्माण झाली नाही. घरकाम, स्वच्छता आणि टापटीप यांना मी आजवर प्राधान्य दिले. मला जुनी गाणी ऐकण्याचा छंद आहे. जीवनाचे सूर आणि गाण्याचे सूर एकरूप झाल्याने जीवन आजवर सुसह्य बनले,” असे त्या सांगतात.
जीवनात अनेक कठीण प्रसंग आले; मात्र प्रत्येक प्रसंगातून बाहेर पडण्याची ताकद परमेश्वराने दिली, अशी त्यांची श्रद्धा आहे. आई-वडिलांचे घर सोडल्यानंतरची सुमारे दहा वर्षे अधिक कष्टाची गेली. परंतु, कष्ट आले म्हणून त्यांनी कधीही निराश होण्याचा मार्ग स्वीकारला नाही.
“आमची पिढी आता हळूहळू संपत आली आहे. मात्र, वयाच्या ७१व्या वर्षी मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे यांच्या प्रेमामुळे आनंदमय जीवनाची वाटचाल सुरू आहे. समाधानी वृत्ती, साधी राहणी, बोलण्यातील गोडवा आणि मैत्रीला दिलेले प्राधान्य यामुळे माझा जीवनप्रवास सुखद बनला आहे,” असे त्या आवर्जून सांगतात.
ज्येष्ठांच्या स्नेहमेळाव्यात वाढदिवसाचा आनंद
अपर्णा कुलकर्णी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त आज स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या मुलांनी आणि मुलीने व सुनानी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
कष्टमय परिस्थितीतही नाउमेद न होता, साधेपणा, समाधानी वृत्ती, मैत्री आणि कुटुंबीयांचे प्रेम यांना जीवनाचा आधार मानत अपर्णा कुलकर्णी यांनी केलेली वाटचाल आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरते. जीवनात परिस्थिती आपल्या मनासारखी नसली, तरी तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या हातात असतो, याची जाणीव त्यांच्या जीवनप्रवासातून होते.
