You are currently viewing शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक भरतीसाठी कागदपत्र पडताळणी सुरू

शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक भरतीसाठी कागदपत्र पडताळणी सुरू

शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक भरतीसाठी कागदपत्र पडताळणी सुरू

सिंधुदुर्ग 

आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदांची भरती प्रक्रिया सुरू असून, पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया दि. 3 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे. नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालयांमार्फत कागदपत्र पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यानुसार ही प्रक्रिया दि. 5 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची एकूण 2 हजार 421 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीशिवाय निवडीसाठी प्राथमिक शिक्षक 927, माध्यमिक शिक्षक 421 आणि उच्च माध्यमिक शिक्षक 252, अशा एकूण 1 हजार 600 उमेदवारांची शिफारस प्राप्त झाली आहे. यामध्ये पेसा क्षेत्रातील 459 तर नॉन-पेसा क्षेत्रातील 1 हजार 141 उमेदवारांचा समावेश आहे.

विभागनिहाय विचार करता नाशिक विभागात 588, ठाणे विभागात 424, नागपूर विभागात 296 आणि अमरावती विभागात 292 उमेदवारांचा समावेश आहे.

संबंधित उमेदवारांच्या पवित्र पोर्टलवरील दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेल्या मूळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्रांसह जाहिरातीनुसार आवश्यक सर्व कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक कागदपत्राची एक स्व-साक्षांकित (Self-Attested) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

निर्धारित दिनांक, वेळ व ठिकाणी उमेदवारांनी उपस्थित राहणे आवश्यक असून, निर्धारित वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.

पात्र उमेदवारांची सविस्तर यादी व कागदपत्र पडताळणीसंदर्भातील सूचना आदिवासी विकास विभागाच्या या https://tribal.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी विभागाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देऊन अद्ययावत सूचना पाहाव्यात, असे आवाहन आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू असून, शिक्षण आयुक्तालयाकडून व्यावसायिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांच्या पडताळणीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, उमेदवारांनी निर्धारित ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित राहावे.

शिक्षक संवर्गातील पेसा क्षेत्रातील पदसंख्या

  • प्राथमिक शिक्षक, मराठी माध्यम – 196
  • प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम – 16
  • माध्यमिक शिक्षक, मराठी माध्यम – 94
  • माध्यमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम – 02
  • उच्च माध्यमिक शिक्षक – 151

शिक्षक संवर्गातील नॉन-पेसा क्षेत्रातील पदसंख्या

  • प्राथमिक शिक्षक, मराठी माध्यम – 593
  • प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम – 122
  • माध्यमिक शिक्षक, मराठी माध्यम – 302
  • माध्यमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम – 23
  • उच्च माध्यमिक शिक्षक – 101

प्रतिक्रिया व्यक्त करा