You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदी अपूर्वा बासूर यांची नियुक्ती
Oplus_16908288

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदी अपूर्वा बासूर यांची नियुक्ती

रविंद्र खेबुडकर यांची बदली; जिल्हा परिषद प्रशासनात नव्या नेतृत्वाची सुरुवात

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) आता श्रीमती अपूर्वा बासूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी काढला असून, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची बदली करण्यात आली आहे.

अपूर्वा बासूर या सध्या पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी, तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी आणि जव्हार उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासनाने त्यांची बदली करून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

शासन आदेशानुसार, बासूर यांनी त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार श्री. पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांच्याकडे सोपवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच विद्यमान CEO रविंद्र खेबुडकर यांनी शासन आदेशानुसार त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अपूर्वा बासूर यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाला नवे नेतृत्व मिळणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत प्रशासन, पाणीपुरवठा तसेच विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा