You are currently viewing माणसातली माणुसकी

माणसातली माणुसकी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री ज्योतिषी सौ. अवनी आदित्य जोशी (दारशेतकर) लिखित अप्रतिम लेख*

 

*”माणसातली माणुसकी”*

 

“जीवनाच्या, सारीपाटावर

सपशिडीचा खेळ रंगला,

कधी चढ, तर कधी उतार

खेळण्यासी, आला तो रमला”

 

माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे. समूहाने, वसाहत करुन राहणे हे त्यास आवडते. आपल्या समूहात तो जन्म घेतो, लहानाचा मोठा होतो. आणि पुढील जीवन त्याच समूहात राहून जगतो. जन्मापासून मृत्यू पर्यंत आपला समूह हा त्यास अगदी, अनादी काळापासून प्रिय आहे.

 

जीवन जगत असताना, अनेक चढउतार त्याला पहावयास मिळतात. कधी काही चांगले अनुभव, चांगली माणसे लाभतात, तर कधी कटू अनुभव आणि किचकट माणसांना देखील त्यास सामोरे जावे लागते.

 

कधीकधी काही, बुद्धिमान व्यक्ती देखील काही शुल्लक कारणासाठी हेका बाळगून, अगदी टोकाला जाऊन वागतात, मनातील प्रेमभाव नकळतपणे हरवून बसतात आणि अनेक लोकांची मन दुखावून, मीच कसा शहाणा हेच सांगण्याचा, गर्व करतात.

 

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असे म्हणताना, आज समाजात जेव्हा बलात्कार, खून, चोरी चे प्रसंग, देवस्थानी चालणारी उटमार, अन्नातील भेसळ, गुंडांची दादागिरी पहावयास मिळते. तेव्हा मन अगदी उदास, नाराज होते. आणि माणुसकी कुठे हरवत चालली आहे? असा प्रश्न नकळत पडतो.

 

“धन ते अधिकचे, कमविण्या

मृगजळा पाठीमागे, धावला

भास आभास, न उमगता

मोहमायेच्या, फेऱ्यात गुंतला”

 

उत्तम जीवन जगण्यासाठी पैसे, गाडी, बंगला हवा असा विचार करत माणूस त्या धनाच्या मोहात पडून वाहवत जाताना दिसतो. आणि येथेही तो माणुसकी हरवून बसतो, त्याच्या मनाची शांतता हरवते.

 

तसेच कारखानदार, व्यावसायिक लोक नोकरदारांचे शोषण करतात, तर महागाईचा भस्मासुर जीवन जगणे महाग करतो, यामुळे मनुष्य आधीच बेजार झालेला असतो.

 

या सर्वांतून आधार शोधताना, सामान्य माणूस हा, भक्ती मार्ग निवडतो आणि भगवंत भक्तीत लिन होतो. येथे देखील भुकेल्यासी द्यावे अन्न, निराधारासी द्यावा आधार, तहानलेल्यासी द्यावे जल, फाटक्यासी द्यावे वस्त्र, आणि सर्व मानव, प्राणीमात्रांना द्यावे प्रेम हे जाणून वागावे, हीच तर शिकवण, आपल्या संतांनी, सर्व जनास, दिलेली आहे, हेच दिसून येते.

 

जेव्हा ही प्रेमाची वागणूक आणि सहृदयता आपल्या सर्वांच्या ठायी रुजेल, वाढेल तेव्हाच तर जीवन जगण्याचा आनंद आपल्याला निर्मळपणे घेता येईल. आणि माणसातील माणुसकी जिवंत राहून सर्वांना मनःशांती लाभेल.

 

“मन करा प्रसन्न

प्रेमभक्तीभावे

सर्वांसी हृदयात

सामावून घ्यावे”

 

सौ. अवनी आदित्य जोशी.(दारशेतकर)

तळेगांव दाभाडे. जि. पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा