*अध्यक्ष, कोमसाप सावंतवाडी तथा जागतिक साकव्य विकास मंच सदस्य, श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित प्रवास वर्णन*
*धार्मिक पर्यटन: मनःशांती आणि आत्मशांतीचा स्रोत*
*पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी दर्शन..*
आयुष्याची पन्नाशी पूर्ण झाली आणि मनात विचार येऊ लागले, आपण कुठेतरी हरवलो की काय..? सर्वांसाठी आपण वेळ देतो मग स्वतःसाठी वेळ कधी द्यायचा..? असेच अनेक प्रश्न मनांगणावर रेंगाळू लागले तेंव्हाच मित्रांच्या मैफिलीत ठरलं… कुठेतरी दूरवर फिरायला जायचं, चार दिवस सर्व ताणतणाव, कामे विसरून स्वतःसाठी जगायचं. पण.., हे ठरवत असताना असाही विचार आला की, देशभरातील आपण न पाहिलेल्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आणि सोबतच प्रेक्षणीय स्थळे पाहिली तर मनःशांती व आत्मशांतीचा सुखद अनुभव घेता येईल. विचारांच्या कळ्या उमलत गेल्या अन् त्यातून सुंदर देखणं पहिलं फूल फुललं…ते पहिलं ठिकाण म्हणजेच श्रीदत्तगुरूंनी साधना करण्यासाठी निवडलेलं गिरनार..! जुलै २०२५ मध्ये धरतीवरचा जणू स्वर्ग म्हणावं अशा गुजरात येथील गिरनार शिखरावर १२.३० वाजता रात्रीच्या अंधारात पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलत, सोसाट्याच्या वाऱ्याने गारठून अक्षरशः थरथरत जवळपास १०००० पायऱ्या चढून, उतरून आम्ही तिघा मित्रांनी दत्तगुरूंच्या अद्भुत सहवासाचा विलक्षण असा अनुभव, अपार सुख नि निरामय आनंद घेतला होता. त्यामुळेच यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून भ्रमंती करण्याचे वेध लागले होते आणि आता पुन्हा कुठे जायचं..? असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा नकळत श्री दत्तगुरूंचा पहिला अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे जन्मस्थान पिठापूर नजरेसमोर उभे राहिले. आंध्रप्रदेश मधील काकिनाडा जिल्ह्यात वसलेलं पिठापूर सावंतवाडीपासून जवळपास ११०० किमी दूर पण श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या जन्मस्थानी जाण्याची ओढ मनास खोलवर लागून राहिली आणि नेहमीप्रमाणे रेल्वेचे बुकिंग करून आम्ही जाण्याचे निश्चित केले…यावेळी आमचा दहावीच्या वर्गातील आणखी एक मित्र निस्सिम दत्तभक्त श्रीपाद आमच्याबरोबर आला त्यामुळे मी, संदीप, सुजित, श्रीपाद असे आम्ही चौघेही १६ ऑगस्टच्या पहाटे ४.३० वाजता घरातून निघालो आणि ६.५५ च्या अमरावती एक्सप्रेसने गोवा, मडगावहून पिठापूरकडे जाण्यासाठी रवाना झालो…
*”श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये”*
हा श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंत्र मुखातून वदत मडगावहून रेल्वेने पिठापूरकडे जाताना पहिला सुखद आनंद देतो तो म्हणजे अवर्णनीय, अद्भुत असा दूधसागर धबधबा ..! जणू उतू जाणाऱ्या दुधासारखा फेसाळत डोंगर कड्यावरून दूधसागर धबधबा अक्षरशः फेसाळत कोसळतो… आणि रेल्वेच्या पटरीच्या खालून जात नदीला मिळतो. तो पाहण्याचा, डोळ्यात साठवण्याचा अन् मोबाईल मध्ये कैद करण्याचा आनंद अवर्णनीय..! उंच कड्यावरून उतू जाणाऱ्या दुधासारखाच फेसळात येणारा दूधसागर पाहिला की डोळ्यांचे पारणे फिटते. जाताना रेल्वेच्या डाव्याबाजूने दूरवर दिसणारा दूधसागर जेव्हा समीप येतो अन् रेल्वेची पटरी धबधब्याच्या मधून जाते नि खालून धबधब्याचे पाणी वाहते ते दृश्य मनाला विलक्षण आनंद देतं. पुढे डोंगर कड्यावरून फेसळात झेपावणारे अनेक छोटे छोटे धबधबे लक्ष वेधून घेतात. खडकांवर फुललेली रानफुले तर मन वेडावून सोडतात अन् धुक्याच्या दाटीतून मार्ग शोधत जाणारी रेल्वे… नि दरीत उतरलेलं धुकं पाहिलं की, जणू आपण स्वर्गसुख अनुभवत असल्याचा भास होतो. हा आभास मनावर हळुवार फुंकर घालतो अन् अर्ध्या रात्री उठून धावपळ केल्याचा शीण, मरगळ, मनावरील ताण सर्वकाही विसरून मनांगणावर सुखांची पेरणी करतो, नकळत आपण निसर्गाच्या सृष्टी सौंदर्यात…हिरव्यागार डोंगर दरीत त्या हिरवाईत हरवून जातो.
हळूहळू आम्ही गोव्याची सीमा ओलांडून कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील आणि ब्रिटिश कालखंडात भारत आणि पोर्तुगीज यांच्या देशाची सीमा म्हटल्या गेलेल्या कॅस्टलरॉक स्टेशनवर पोचलो. अलीकडे नूतनीकरण करण्यात आल्याने ब्रिटिशकालीन स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना असलेल्या पाऊलखुणा बऱ्याच प्रमाणात पुसल्या गेल्या तरी स्टेशनचे ऐतिहासिक महत्त्व आजही मनात घर करून राहिलं आहे. कर्नाटकातील घनदाट अरण्यातून वाट काढत गाडी हुबळी, धारवाड मार्गे कर्नाटकातील आणखी एका महत्त्वाच्या आणि बंगळूर कॅन्टोन्मेंट नंतर सर्वात जुन्या बेल्लारी कॅन्टोन्मेंट रेल्वे स्टेशनवर पोचतो. रेल्वेतून दिसणारा बल्लारी गुड्डा टेकडीवर वसलेला व विजयनगर साम्राज्याचा भाग असलेला १६ व्या शतकात बांधलेला बेल्लारी किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. हा किल्ला जमिनीपासून सुमारे ४५० फूट (१४० मीटर) उंचीवर गुलसर रंगाच्या एकाच विशाल ग्रॅनाइट खडकावर उभा आहे. या किल्ल्याकडे पाहिल्यावर पाहतच रहावे असे मनोमन वाटून राहते एवढा विशाल आणि मनोहारी किल्ला आहे. रेल्वेतून किल्ल्याचा पुढील आणि मागील भाग, बुरुज स्पष्टपणे दिसतात.
गाडी आपला वेग वाढवते आणि आंध्रप्रदेशातील गुंतकल जंक्शनवर काही काळ विसावते. या जंक्शनवर अप्रतिम अशा कॉफीचा आस्वाद घेऊन आम्ही गुंटूर मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या आंध्रप्रदेशातील महत्त्वाच्या गुंटूर स्टेशनवर स्विगीवरून (रेल्वेत मांसाहारीच जेवण जास्त प्रमाणात असल्याने) मागवलेल्या जेवणाचा आस्वाद घेऊन विजयवाड्याच्या दिशेने कूच केले. मध्यरात्रीनंतर येणाऱ्या विजयवाडा शहरातील रात्रीच्या अंधारात दिसणारी विद्युत रोषणाई मनाला विलक्षण आनंद देऊन गेली. विजयवाडा शहरातील स्थापत्य कलेचा वेगळाच नमुना असलेलं चर्च आणि मोठ्या अक्षरात ओम लिहिलेलं शिवमंदिर मन प्रसन्न करतं. हळूहळू रात्रीचा अंधार दूर होत जातो अन् पहाटेच्या सोनेरी सूर्यकिरणांनी आभाळ भगवेमय होऊ लागते… नि पिठापूर पासून जवळपास आठ किलोमीटर दूर असलेल्या सामलकोटा जंक्शनवर आमची स्वारी उतरते… अमरावती एक्सप्रेसचा निरोप घेऊन प्रसन्न वातावरणात स्टेशनच्या बाहेर पडतो… मडगाव, गोव्याहून निघालेली अमरावती एक्सप्रेस गाडी कर्नाटक, आंध्रप्रदेश, बिहार, ओरिसा असा प्रवास करत पश्चिम बंगाल मधील शालिमार (कलकत्ता) येथे जाण्यास निघते…आणि आम्ही स्टेशनच्या बाहेर चहाचा आस्वाद घेऊन रिक्षाने पिठापूरकडे रवाना होतो… सामलकोटा स्टेशनवरून शेअर रिक्षाने ५०/- रुपये प्रति व्यक्ती किंवा खाजगी रिक्षा अगदी आठ दहा जण बसले तरी ५००/- रुपये तर कार ८००/- रुपयात पिठापूरमध्ये नेऊन सोडते.
रिक्षाने पिठापूरकडे जात असताना अगदी किरकोळ पावसाचे प्रमाण असूनही रस्त्याच्या दोन्ही बाजूला जिथे नजर पोचेल तिथेपर्यंत मैलोनमैल दूरदूर पसरलेली हिरवीगार भातशेती पाहिली की कोकणातील भातशेती तिच्यापुढे क्षुल्लक वाटू लागते. कोकणातील डोंगर उतारावरची भातशेती मनोवेधक भासते तर आंध्रप्रदेशातील भातशेती मनमोहक दिसते. भातशेतीच्या बाजूने बांधावर वाऱ्याच्या तालावर डुलणारी माडाची झाडे, अधूनमधून दिसणाऱ्या छोट्या छोट्या आम्रतरुंच्या बागा आपण कोकणातच आहोत की काय…? असा क्षणभर भास करून जातात अन् सोबतीला उंचच उंच ताडाची, खजुराची झाडे शीळ घालणाऱ्या पवन संगे अंगाभोवती पिंगा घालत नकळत कानात आंध्राची ओळख सांगतात… कोकणासारखा कोसळणारा पाऊस किंवा आजुबाजूला नदी नसतानाही भातशेतीमध्ये मुबलक असलेलं पाणी पाहिलं की, एवढं पाणी आलं कुठून..? असा भाबडा प्रश्न मनाला सतावू लागतो परंतु मोठ्या प्रमाणावर असलेल्या कुपनलिकांमुळे पाण्याचा साठा मुबलक असल्याचे कळून येते. ऑगस्ट महिन्यातही अंग भाजून निघेल असं कडक ऊन तरीही हिरवागार निसर्ग असा दुर्मिळ योगायोग मात्र काकिनाडा जिल्ह्यात पहायला मिळतो हे विशेष..!
पंधरा मिनिटांचा प्रवास करून आम्ही पिठापूर येथे पोहोचलो…नि मंदिराच्या दारातूनच छोट्याशा गल्लीतून “श्री दत्त निवास” या महाराष्ट्रीयन सातारकर संजय व सुजाता गारळे यांच्या हॉटेलवर पोहोचलो. नवीनच असलेल्या हॉटेलमध्ये संजय गारळे यांनी आमच्यासाठी ४ बेडची वातानुकूलित खोली राखून ठेवलेली. संजय सुजाता उभयतांमुळे आम्ही आंध्रात आलो की, आंध्रप्रदेश महाराष्ट्रात आलाय? असा आम्हाला प्रश्न पडला एवढी उत्तम व्यवस्था सातारकरांनी करून ठेवली होती. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूरचे देखील रूम उपलब्ध असतात पण, त्यासाठी किमान ४० दिवस आधी बुकिंग करावे लागते. २४ तास प्रवासाचा शीण घालवून आंघोळी आटोपून प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनासाठी पोचलो. सकाळचे साडे आठ वाजले होते, ९.०० वाजता मंदिरात नोंदणी केलेल्या भक्तांचा सामूहिक अभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. परंतु त्यासाठी आणि सायंकाळी पालखी सेवा वगैरे घ्यायची असेल तर सकाळी ६.०० वाजता योग्य ते शुल्क भरून नोंदणी करावी लागते. पालखी सेवेसाठी सोवळे नेसणे अनिवार्य आहे. आम्ही उशिरा पोचल्याने आमचा पहिल्या दिवशी अभिषेक पालखी सेवेचा योग गेला परंतु दुसऱ्या दिवशी पहाटे ५.०० वाजताच मंदिरात येऊन पहाटे ५.०० ते ६.०० पर्यंत मिळणारे मूळ पादुका दर्शन घेतले अन् त्या मूळ पादुका दर्शनाने धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. त्यानंतर ६.०० वाजताच रुद्राभिषेक आणि पालखी सेवेसाठी नोंदणी करून स्वामींसमोर पेढे आदी नैवेद्य ठेऊन आशीर्वाद घेतले. तिथे एक पद्धत आवडली म्हणजे आपण ठेवलेला प्रसाद तेथील ब्राह्मण आपल्याला साभार परत देतात अन् जर आपण प्रसाद मग पेढे असोत किंवा केळीचा संपूर्ण घड… ब्राम्हण तो प्रसाद येणाऱ्या प्रत्येक भाविकास वाटतात. दत्तगुरूंसाठी दिलेल्या तुळशी अन् शुभ्रधवल फुलांच्या माळा दत्तगुरु, श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती व पादुका सजविण्यासाठी वापरतात…त्यामुळे स्वामींच्या चरणी अर्पण केलेली फुले, फळे, प्रसाद सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते.
सकाळी अभिषेक किंवा रुद्राभिषेक, नोंदणी केलेल्या सर्वांना मंदिरात बसवले जाते. ब्राम्हण मंत्रोपचार करतात अन् जशा खुणेने सूचना करतात तसे प्रत्येकजण क्रिया करत राहतात. गाभाऱ्यात दुसरे ब्राम्हण मूळ पादुकांवर चांदीचे रुपडे चढवून त्यावर दूध, दही तूप, मध, साखर, सुखामेवा अशा नानाविध पंचामृताच्या सहाय्याने रुद्राभिषेक करतात अन् अभिषेक झाल्यावर पादुका, चांदीची दत्तमूर्ती आणि दत्तगुरु, श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती तुळशी माळा, फुलांच्या माळा नि नानाविध फुलांनी सजवतात. अविरत मंत्रोपचार आणि “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…” “श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये” असा जयघोष सुरू असतो. प्रत्येकजण दत्तमय, स्वामीमय होतो अन् अभिषेक संपूर्ण होताच प्रत्येकाला महासंस्थान कडून श्रीफळ, स्वामींचा फोटो आणि प्रसाद दिला जातो. यावेळी अभिषेक केलेलं पंचामृत ग्लास भरून पिण्यासाठी दिले जाते, ते पंचामृत मात्र अमृतासम भासते…नक्कीच पंचामृत पिण्याचा योग चुकवू नये. दुपारी १२.३० वाजल्यापासून अन्नछत्रात महाप्रसाद दिला जातो, सोबत पिण्यासाठी ताक सुद्धा असते.
सायंकाळी पालखी सेवा करण्याची संधी मिळाल्याने आम्ही सोवळे नेसून खांद्यावर उपरणे घेऊन ६.३० वाजता मंदिरात पोचलो. स्वामींचे दर्शन घेऊन आमच्याकडे असलेली पावती दाखविल्यावर आम्हाला पालखी सेवेसाठी ओळखपत्र देण्यात आले. पालखी सोहळ्यापूर्वी विविध वाद्यांच्या तालावर भक्तगणांचे भक्तिगीत, अभंग गायन सुरूच होते. त्यामुळे मंदिरातील वातावरण दत्तमय झाले होते. ठीक ७.०० वाजता पालखी सोहळा सुरू झाला. भक्तिसरसात न्हाऊन निघालेला हा पालखी सोहळा सर्वांगाला विलक्षण असा आनंद देऊन गेला. जिथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्म झाला त्या पिठापूर क्षेत्री खांद्यावर स्वामींची पालखी घेऊन मंदिर प्रदक्षिणा करण्याचे भाग्य मिळणे याहून दुसरे पुण्य ते काय असणार…! पालखीचे भोई होताच मन भरून आले, डोळ्यांच्या कडा ओलावल्या अन् सुख म्हणजे नक्की काय असते…त्या खऱ्या सुखाची अनुभूती झाली. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा जयघोष झाला अन् पालखीचे भोई होण्याचा बहुमान मिळाल्याने धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा पालखी सेवेत सहभागी असलेल्या प्रत्येकाला श्रीफळ, उपरणे नि प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक सोहळ्याच्या वेळी मंदिराच्या आवारात रांगेत भक्तगणांसाठी कधी प्रसाद कधी चंदन, भस्म आदींचे वाटप सुरू असायचे त्या प्रत्येकाचा लाभ घेत आम्ही दत्तगुरूंच्या सानिध्यात असल्याचा पुरेपूर आनंद उपभोगत होतो. इथे मंदिराच्या समोर असलेल्या औदुंबरच्या वृक्षाला श्रीफळ बांधून आपली मनोकामना मागण्याची प्रथा आहे. पण श्रीफळ वाढविण्याची मात्र प्रथा नाही.
जवळपास तीन दिवस आम्ही श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन आदी सेवांचा लाभ घेत होतो. मंदिरातील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत होतो आणि उरलेल्या मधल्या वेळेत पिठापूर जवळील काकिनाडा जिल्ह्यातील इतरही देवालये, प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचाही लाभ उठवत होतो. पहिल्या दिवशी आम्ही गाडी भाड्याने घेऊन प्रथम जवळच असलेल्या पुरातन कुंती माधव मंदिराचे दर्शन घेतले आणि बिहार मधील “गया” सारखेच प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या “पादगया” या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊन पाय धुतले. गयासूर नावाच्या राक्षसाच्या विशाल शरीराचे पाय या ठिकाणी होते, म्हणून येथील पवित्र कुंडाला ‘पादगया पुष्करिणी’ म्हणतात. या तीर्थक्षेत्रामध्ये प्रामुख्याने पितरांच्या मोक्षासाठी पिंडदान, श्राद्ध, आणि तर्पण हे धार्मिक विधी करतात व पाण्यात डुबकी मारून आत्मशुद्धी म्हणजे शरीर व मन शुद्ध करण्यासाठी पवित्र स्नान करतात. पाप मुक्तीसाठी देखील पादगया तीर्थक्षेत्रात स्नान केले जाते असेही म्हणतात.
पिठापूर मध्ये याच ठिकाणी शैव, शाक्त आणि दत्त संप्रदायांचे एक अद्वितीय संगम मानले गेलेले अत्यंत प्राचीन कुक्कुटेश्वर स्वामी मंदिर आहे. येथे कोंबड्याच्या आकाराचे पांढऱ्या स्फटिकांचे “स्वयंभू स्फटिक शिवलिंग” विराजमान आहे. कोंबड्यासारखा आकार असल्याने त्याला कुक्कुटेश्वर असे नाव पडले आहे. या शिवलिंगाचे दर्शन घेताना सुखद अनुभूती येते अन् मन प्रसन्न होते. आम्ही २०/- रुपयांचा निधी देऊन पास घेतल्याने वेगळ्या रांगेत परंतु मंदिराच्या गाभाऱ्याच्या जवळ जाऊन दर्शन घेण्याची संधी मिळाली. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकाच अखंड दगडातून कोरलेला भव्य एकशिला नंदी आहे, जो लेपाक्षी येथील नंदीनंतर आंध्र प्रदेशातील दुसरा सर्वात मोठा नंदी मानला जातो. या मंदिराच्या आवारात वेगवेगळी छोटी छोटी मंदिरे आहेत परंतु, त्यात महत्त्वाचे म्हणजे अठरा महाशक्तींपैकी एक पुरुहुत्तिका देवीचे मंदिर या आवारात आहे. कुक्कुटेश्वरचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आणि तेथीलच काथुलागुडेम भागातील श्री स्वामी समर्थांच्या मठात स्वामींचे दर्शन घेऊन नित्यनेमे तिथे सुरू असलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला व बाजूलाच असलेल्या गोपाल बाबांच्या आश्रमात बाबांची धुणी, त्यांची विश्रांतीची खोली आदींसह बाबांचे दर्शन घेऊन अनघादत्त मंदिर दर्शनासाठी प्रस्थान केले. पिठापूर येथील श्री अनघा दत्त क्षेत्रं हे भगवान दत्तात्रय आणि त्यांची शक्ती माता अनघा लक्ष्मी यांना समर्पित असलेले एक अत्यंत जागृत आणि सुंदर मंदिर आहे. येथे अत्यंत दुर्मिळ अशी अनघा दत्त मूर्ती पहावयास मिळाली.
अनघा लक्ष्मीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो तो थेट अन्नावरम येथील रत्नागिरी टेकडीवर वसलेल्या श्री वीरा वेंकट सत्यनारायण स्वामी दर्शनासाठी…! रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली भातशेती आणि नारळ, ताड नि खजुराची बागायती लक्ष वेधून घेत होती. कडक उन्हात देखील हवेची झुळूक अंगाला गारवा देत होती. गाडी जसजशी रत्नागिरी टेकडीवर चढू लागली तशी तिरुपती बालाजी दर्शनाला जाताना लागणाऱ्या टेकडीच्या रस्त्याची आठवण प्रकर्षाने झाली. मंदिर परिसरातील पायऱ्या चढल्यावर खोलवर दिसणारे पंपा नदीचे पात्र अन् निसर्गाचे विहंगम दृश्य मनाला वेडावून सोडतं. दर्शन रांगेतून साधारणपणे अर्ध्या तासाने आम्ही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासमोर पोचलो. हे मंदिर भगवान विष्णूचे अवतार असणारे श्री वीर वेंकट सत्यनारायण स्वामी यांना समर्पित आहे. येथे मुख्य गाभाऱ्यात एकाच गाभाऱ्यात सत्यनारायण स्वामी, बाजूला अनंत लक्ष्मी देवी आणि शिवाची मूर्ती आहे. मूर्तींचे सौंदर्य अवर्णनीय असेच आहे. बरीच गर्दी असल्याने काही क्षण ते अथांग सुंदर रूप डोळ्यात साठवून आम्ही बाहेर आलो. तिरुपती बालाजी मंदिरानंतर आंध्रप्रदेशात हे सर्वात जास्त प्रसिद्ध आणि भाविक भेट देत असलेले दुसरे मोठे पवित्र ठिकाण आहे. मंदिराची वास्तुकला द्रविडीयन शैलीत केली गेली असून, मुख्य मंदिर एका भव्य रथाच्या आकारात बांधले आहे. या रथाच्या चारही कोपऱ्यांना चार मोठी चाके आहेत, जे काळाच्या प्रवाहाचे प्रतीक मानले जातात. मंदिर सत्यनारायण व्रताच्या आयोजनासाठी आणि विवाहासारख्या शुभ कार्यांसाठी अतिशय पवित्र मानले जाते. या ठिकाणी नुकतेच लग्न करून विवाहाच्या पेहरावात सत्यनारायण स्वामींचे दर्शन घेण्यासाठी जोडीने उभी असलेली अनेक जोडपी पहायला मिळत होती. मंदिरात मोबाईल नेण्यास मनाई असल्याने आम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर एक आठवण म्हणून फोटो काढून पुन्हा पिठापूरकडे निघालो.
दुसरा दिवस रुद्राभिषेक पूजा झाल्यावर महाप्रसाद घेऊन आम्ही काकिनाडा बीच पहायला गेलो. विस्तीर्ण पसरलेला काकिनाडा समुद्रकिनारा आणि जवळच असलेला काकिनाडा पोर्ट व पोर्टवर लागण्याच्या प्रतीक्षेत समुद्रात नांगरून ठेवलेली कितीतरी विशालकाय जहाजे पाहता आली. तिथेच असलेल्या उद्यानात नौसेनेचे विमान प्रदर्शनासाठी ठेवले आहे. तिकीट काढून या विमानाच्या आतील भागाची व्यवस्था पाहता येथे. इथे छान छायाचित्रे घेऊन आम्ही १००० वर्षे जुने असलेले ऐतिहासिक श्री भावनारायण स्वामी मंदिर पाहण्यास गेलो. शांत वातावरण आणि द्रविडियन शैलीतील स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असलेलं हे विष्णू मंदिर आहे. नारद मुनींनी याठिकाणी स्वतः पूजा केलेली अशी येथे मान्यता आहे. संपूर्ण मंदिर दगडी खांब आणि विशेष म्हणजे दगडी बीम व दगडीच छताचे आहे. मंदिराची जडणघडण, बांधकाम अद्भुत असल्याने नक्कीच पाहण्यासारखे आहे. परंतु दुसरी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने आपला बराच वेळ तिथे वाया जातो. शहरात इतरही प्रसिद्ध मंदिरे आहेत यात श्री बाला त्रिपुरा सुंदरी मंदिर, इस्कॉन मंदिर पाहण्यासारखी आहेत.
तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजताची आमची रेल्वे होती पण, आम्ही घेतलेली रूम त्यादिवशी दुसरे बुकिंग असल्याने सोडायची होती. त्यामुळे सकाळीच आवरून आम्ही सामान हॉटेलच्या ऑफिसमध्ये ठेवून मंदिरात पुन्हा दर्शनासाठी गेलो. तिथून श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आजोबा बापनाचार्य यांचे स्वगृहम् जिथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे बालपण गेले त्या वास्तूला भेट देऊन औदुंबर वृक्षाला राखी बांधून मनोकामना व्यक्त केली. तिथे बापनाचार्य महाअन्नदान ट्रस्ट तर्फे नित्य महाप्रसाद, अन्नदान सुरू असते. त्या वास्तूचे दर्शन घेऊन आल्यावर आमची गाडी दुपारची असल्याने हॉटेलच्या मालकीण सुजाता गारळे यांनी दुपारपर्यंत विश्रांतीसाठी आम्हाला दुसरी रूम मोफत उपलब्ध करून दिली कारण, आम्ही सावंतवाडीहून गेलो होतो आणि हॉटेल मालक संजय गारळे हे सावंतवाडीतील माझ्या जवळच्या परिचयाचे असलेले ऑर्थोपेडिक डॉ.रेवणसिद्ध खटावकर यांचे बालमित्र आहेत. त्यामुळे सावंतवाडीमधून कोणीही गेलं तरी संजय गारळे आत्मियतेने सेवा देतात, अगदी ते आम्हाला चहापानासाठी स्वतःच्या घरी सुद्धा घेऊन गेले होते. तसेच पिठापूर येथे येणारे ९०% दत्तभक्त हे महाराष्ट्रातूनच येतात आणि मराठी भाषाच अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळते. त्यामुळे आम्ही आमच्या घरापासून दूर आंध्रप्रदेश मध्ये आहोत असे एकदाही आम्हाला वाटले नाही…किंबहुना मंदिरातील सर्व पुजारी, ब्राम्हण मंडळी सुद्धा अतिशय आपुलकीने वागतात हे ही विशेष.. कदाचित ती श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचीच लीला असेल…!
दुपारी २.३० वाजता संजयने गाडी बोलावली आणि आम्ही लवकरच पुन्हा स्वामी दर्शनासाठी येऊ अशी मनोमन इच्छा व्यक्त करून पिठापूर वरून सामलकोटा जंक्शनकडे परतीच्या प्रवासासाठी निघालो. येताना पुन्हा कॅस्टलरॉक मडगाव रेल्वे मार्गावर असलेल्या दूधसागर धबधब्याचे चित्रीकरण करत पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन आध्यात्मिक पर्यटन सहल आठवणींच्या कप्प्यात जतन करून समाधानाने पाचव्या दिवशी सायंकाळी घरी पोचलो…!
✒️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
